

चांदवड (नाशिक) : तालुक्यातील वडगावपंगू येथे पोल्ट्री फार्मवर वीज पडून जवळपास दोन हजार कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. त्यात शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
तालुक्यात आठवडाभरापासून अवकाळीचा फेरा सुरूच आहे. दररोज मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. रविवारी (दि. १९) रात्री अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात वडगावपंगू येथील शेतकरी लहानू काशीनाथ मोरे यांच्या पोल्ट्री फार्मवर वीज पडली. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तत्काळ पंचनामा केला. या पावसाने उन्हाळी टोमॅटो पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेला कांदा सडण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.