

नांदगाव (नाशिक): नांदगाव तालुक्यासह मनमाड शहर परिसराला सोमवारी (दि. ५) दुपारी अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, ही पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मनमाड व नांदगावकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
तालुक्यातील आमोदे परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला तर इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
दुपारी तीन वाजेनंतर हवामानात अचानक बदल होत आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच पाऊस व गारपीटीला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवला कांदा पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगली धावपळ उडाली. सध्या आमोदे परिसरात उन्हाळ कांदा काढणीला तसेच मका सोगणीला वेग आला आहे. अशातच बेमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह अचानक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची शेती पिकं पावसामुळे पूर्णपणे भिजली आहेत. कांदा, मका, शेवगा, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.