

नाशिक : राज्यासह जिल्ह्याला अवकाळी गत आठ दिवसांपासूनच चांगलीच झोडपून काढत आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे नळवाडी येथील शेतकरी खातेदार रामदास दगडू सहाणे (35) हे शुक्रवारी (दि.16) दुपारी वादळवार्यासह सुरु असलेल्या पावसात वीजेच्या तारेचा शॉक लागून त्यांच्याच मालकीच्या गटात असलेल्या विहीरीत पडून मयत झाले तर नाशिक शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड कोसळून त्याखाली दबले गेल्याने अशोक जाधव (60) जखमी झाले.
गत आठवड्याभरात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. अनेकठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर काहीठिकाणी पशुंचा मृत्यूही झाला आहे. नाशिक शहर व परिसरात गत दोन दिवसांपासून दुपारच्या सत्रात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गत तीन दिवसांपासून सलग वादळीवार्यासह पावसाची हजेरी सुरू आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यातील 141 गावे अवकाळीने बाधित झाली आहेत. गारपीटचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष आणि डाळींबाचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या अवकाळीने आतापर्यंत 3 हजार 184 हेक्टर क्षेत्र बाधित केले यात कांदा, गहू, टॉमेटो, भाजीपाला या पिकांसह फळबागांनाही तडा गेला.
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे वादळी वारा आणि पावसामुळे रघुनाथ डोमाडे यांची गाय मृत्यूमुखी पडली तर चिंचोली येथे तीन गाईंचा मृत्यू झाला. देवळ्यातील कुंभार्डे येथे विठ्ठल वाघ यांच्या दोन मेंढ्या वीज पडून मृत्यूमुखी पडल्या. गेल्या चार दिवसांत नाशिक आणि बागलाणला अवकाळीने प्रचंड फटका दिला.