

नाशिक : यंदा जिल्ह्यात 5 ते 29 मे दरम्यान अवकाळी व गारपिटीने शेतीपिकाला चांगलेच झोडपले. पावसाने उघडीप घेतल्याने नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, या 15 दिवसांच्या कालावधीत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 7 हजार 75 हेक्टवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अवकाळीमुळे सुमारे 1 हजार 192 गावे बाधित झाली असून, सुमारे 21 हजार 473 शेतकर्यांना याचा फटका बसला आहे.
एकूण बाधित झालेली गावे : 1192
एकूण बाधित शेतकरी : 21 हजार 473
नुकसान झालेले एकूण क्षेत्र : 7 हजार 75 हेक्टर
पीकनिहाय झालेले नुकसान
मका : 69.43 हेक्टर
कांदा : 3 हजार 357 हेक्टर
बाजरी : 104.23 हेक्टर
टोमॅटो : 171.05 हेक्टर
भुईमूग : 47.35 हेक्टर
भाजीपाला : 940 हेक्टर
आंबा : 1991 हेक्टर
डाळिंब : 345 हेक्टर
एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा हा 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे मे महिन्यात पारा आणखी वाढण्याची शक्यता होती. परंतु, यंदा मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यात जिल्ह्याला चांगलाच दणका दिला. मे महिन्यात 16 वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 5 मे पासून सुरू झालेला पाऊस हा साधारण 29 मे पर्यंत होता. या अवकाळीने बहुतांश शेतीपिके आणि फळपिकांना नष्ट केली. काढणीला आलेला कांदा अन साठवणूक केलेला कांदाही यातून वाचू शकला नाही. जिल्ह्यातील सुमारे 7 हजार 75 हेक्टर क्षेत्राला अवकाळीने बाधित केले.
वादळीवारे, अतिवृष्टी, अवेळी पावसाने शेतीपिकांचे आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी त्वरीत दिले होते. त्यानूसार तालुका कृषी अधिकार्यांनी पंधरा तालुक्यांतील नष्ट झालेल्या शेतीपिकांचा प्राथमिक अहवाल तयार करुन कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना सादर केला आहे. कृषी अधीक्षकांनी तो जिल्हा प्रशासनाला सादर केलेला आहे.