

नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील तीन मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमध्ये मनमाड-जळगाव चाैथ्या रेल्वेलाइनला मंजुरी देताना २,७७३.२६ कोटींची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त भुसावळ-खंडवा तिसऱ्या व चौथी लाइन तसेच माणिकपूर-इरादतगंज तिसरी लाइनचा यात समावेश असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (दि. २६) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधांच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करताना मध्य प्रदेशशी संपर्क वाढवणे तसेच मुंबई-प्रयागराज-वाराणसी कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गतच जळगाव-मनमाड चौथी लाइन, भुसावळ-खंडवा तिसरी व चौथी लाइन आणि माणिकपूर-इरादतगंज तिसरी लाइनसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या तीन्ही प्रकल्पांसाठी अंदाजे ७,९२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार व अवधचा भाग महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. तसेच प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प रेल्वेगाड्यांचे परिचालन सुलभ करतानाच गर्दी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वासही वैष्णव यांनी व्यक्त केला.
मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लानचे परिणाम आहेत. ते प्रवासी, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड दळणवळण प्रदान करतील. या प्रकल्पांमुळे बांधकाम कालावधीत सुमारे एक लाख मनुष्यबळाचा थेट रोजगार निर्माण होणार आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये पायाभूत सुविधा उभारणीवर भर देत आहे. त्याअंतर्गत नाशिक, जळगाव, बुरहानपूर, खंडवा, रिवा, चित्रकूट व प्रयागराज या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे ६३९ ट्रॅक किमीपर्यंत विस्तारले आहेत.
-शिर्डीचे साई मंदिर, शनि शिंगणापूर, पंचवटी, काळाराम मंदिर, गोदावरी गोमुख, वणी व घृष्णेश्वर मंदिर या धार्मिक स्थळांना भेट देण्याची सुविधा उपलब्ध देईल.
-खजुराहो, अजिंठा आणि एलोरा लेणी तसेच देवगिरी, असीरगड व रिवा किल्ला, यावल वन्यजीव अभयारण्य, कोटी धबधबा आणि पूर्वा फॉल्स यांसारख्या युनेस्को जागतिक वारसास्थळांमध्ये प्रवेश सुधारून पर्यटनाला चालना देईल.
मनमाड-जळगावदरम्यान १६० किलोमीटरच्या चौथ्या मार्गासाठी २,७७३.२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच भुसावळ-खंडवा तिसरी आणि चौथ्या लाइनचा प्रकल्प १३१ किलोमीटरचा असून, त्यासाठी ३,५१३.५६ कोटींचा खर्च अंदाजित आहेत. हे प्रकल्प मार्गी लागून दळणवळण वाढणार आहे. कोळसा, स्टील, कंटेनर आणि कांदे, फळे आणि सोयाबीनसह अन्य मालवाहतूक शक्य होईल. या दोन्ही प्रकल्पांमुळे वार्षिक साधारणत: १२ कोटी लिटर डिझेलची बचत होणार असून, कॉरिडॉरमधील गर्दी कमी करतानाच सुरक्षा वाढणार आहे.