

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 52.17 लाख जोडण्यांपैकी तब्बल 44.1 लाख जोडण्या 2016 ते 2021 या कालावधीत उज्ज्वला 1.0 अंतर्गत तर उर्वरित 8.06 लाख जोडण्या 2021 ते डिसेंबर 2024 या कालावधीत उज्ज्वला 2.0 अंतर्गत वितरित झाल्या आहेत.
पारंपरिक इंधनामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम कमी करणे, महिलांचे सक्षमीकरण, घरगुती प्रदूषणात घट आणि स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. 1 मे 2016 रोजी बलिया (उत्तर प्रदेश) येथे पहिली जोडणी देऊन या योजनेचा शुभारंभ झाला. ही योजना पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येते. योजनेंतर्गत 2011 सर्वेक्षणाच्या आधारे गरीबी रेषेखालील कुटुंबातील महिलांची पात्रता निश्चित केली जाते. विशेष करुन अनुसूचित जाती जमाती व इतर वंचित घटकांना प्राधान्य दिले जाते. भारतात उज्वला योजनेच्या एकूण कनेक्शन्सची संख्या जुलै 2025 पर्यंत 10.33 कोटी इतकी झाली आहे.
योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन, रेग्युलेटर, होज पाईप व पुस्तिका दिली जाते. चुल व पहिल्या रिफिलसाठी कर्ज/ईएमआयची सुविधा तसेच 1,600 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. ऑगस्ट 2021 पासूनच्या उज्ज्वला 2.0 मध्ये डिपॉझिट-फ्री कनेक्शन, पहिला सिलिंडर आणि गॅस स्टोव्ह मोफत देण्यात येतो. कागदपत्रांची अट सुलभ असून फक्त स्वघोषणेनुसार पात्रता निश्चित केली जाते. स्थलांतरित कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळतो.
काही लाभार्थींना रिफिलचा वाढता खर्च परवडत नाही, अनुदान उशिरा मिळते, ग्रामीण भागात पुरवठ्याच्या अडचणी आहेत. काहीजण पारंपरिक इंधन लाकूड, गोवऱ्या वापरतात.
स्वयंपाकासाठी लाकूड, गोवऱ्या, कोळसा, केरोसिन यांसारखे पारंपरिक इंधन वापरले जात असे.
धुरामुळे डोळ्यांचे आजार, श्वसनाचे विकार, दम्याचे त्रास आणि फुफ्फुसांचे आजार वाढत.
बंदिस्त स्वयंपाकघरात धूर साठल्याने घरातील लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना गंभीर त्रास होत असे.
इंधन गोळा करण्यासाठी महिलांना लांब अंतरावर जावे लागे, त्यामुळे वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत असे.
कोळसा व केरोसिनमुळे आग लागण्याचा धोका कायम असे.
इंधन गोळा करण्यात वेळ खर्च झाल्यामुळे महिलांना शिक्षण व रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत असे.
उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात मोठा बदल घडला आहे. एलपीजी गॅस उपलब्ध झाल्यामुळे धूरमुक्त स्वयंपाक करणे शक्य झाले आणि डोळे तसेच फुफ्फुसांच्या आजारांपासून बचाव झाला. लाकूडफाटा गोळा करण्यासाठी वेळ खर्च न लागल्याने महिलांना इतर कामे आणि रोजगारासाठी अधिक वेळ मिळू लागला. गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असल्याने त्यांना सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा लाभ झाला. स्वयंपाकघरातील धूर कमी झाल्यामुळे मुलांनाही स्वच्छ वातावरणात वाढता येऊ लागले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक आता जलद, सोपा आणि सुरक्षित झाला असून महिलांचे जीवनमान उंचावले आहे.
उज्वला योजना फेज- 1 : 44,41,015
उज्वला योजना फेज- 2 : 8,06,206
(15 ऑगस्ट 2024 पर्यंत) - 52,17,221 जोडणी