सिन्नर(जि. नाशिक) : युवा नेते उदय सांगळे यांनी मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी (दि. २२) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतली. खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, गजानन शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश झाला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर ते आव्हान निर्माण करतील अशी चिन्हे आहेत. सांगळे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात होते. तथापि, मध्यंतरीच्या काळात त्यांची शिवसेना शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र तसे झाले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
विद्यमान स्थितीत सिन्नर विधासभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्याने त्यांनी पक्षप्रवेशासाठी फिल्डिंग लावली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांनी मुंबईतच तळ ठोकलेला होता. वाय. बी. चव्हाण सेंटरवर बैठकांचे सत्रही सुरू होते.
रविवारपासून सांगळे यांच्या शरद पवार गटात पक्षप्रवेशाच्या बातम्या येत होत्या. आघाडीतील जागावाटपांच्या तिढ्यात सांगळे वेटिंगवर होते.
जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनीही उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे आव्हाड यांनाही मुंबईत बोलावण्यात आले होते. रात्री १० पर्यंत बैठक सुरू होती. आव्हाड यांनीही पक्षादेश शिरसावंद्य मानून काम करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे सांगळे यांचा मंगळवारी पक्षप्रवेश झाला.
निवडणुकीआधी महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच बघायला मिळाली. मात्र, सरतेशेवटी युवा नेते उदय सांगळे, कोंडाजीमामा आव्हाड, बाळासाहेव वाघ, डॉ. रवींद्र पवार अशी मोजकीच नावे स्पर्धेत उरली. उमेदवारी मागणाऱ्या प्रत्येकासमोर वरिष्ठांनी सर्व्हकार्ड ठेवल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार कोकाटे यांना तगडे आव्हान देऊ शकणारे उदय सांगळे यांच्या नावाला शरद पवार गटाने पसंती दिल्याचे सांगितले जाते.