

वणी (नाशिक): भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा सुंदर संगम सातासमुद्रापार न्युझीलंडच्या ऑकलंड शहरात पाहायला मिळाला. तुलसी विवाहाचा पवित्र सोहळा भारतीय पारंपरिक रितीरिवाजांनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या २५ वर्षांपासून ऑकलंड येथे स्थायिक असलेल्या उपाध्ये कुटुंबाने आपल्या मित्रपरिवारासह हा धार्मिक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला. अनिल उपाध्ये व त्यांच्या पत्नी स्मिता उपाध्ये यांनी या सोहळ्याचे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात आयोजन करत रविवार (दि.2) रोजी तुलसी विवाह साजरा केला
या विवाह सोहळ्याची सुरुवात श्रीकृष्ण मुर्ती व तुलसीचे वृंदावन मिरवणुकीतून आणून करण्यात आली. पारंपरिक विधी, मंगलाष्टकांचा निनाद, अंतरपाट, मुंडवळ्या आणि अक्षता यांसह संपूर्ण विधींसह हा विवाह संपन्न झाला. सर्व उपस्थितांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या विवाह सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला.
विवाहानंतर सर्वांनी एकत्र येऊन विवाह मेजवानीचा आनंद घेतला. परदेशात राहूनही भारतीय संस्कृतीचा गंध जिवंत ठेवणाऱ्या अशा उपक्रमामुळे भारतीय समाजात एकतेचा आणि परंपरेचा संदेश दिला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. न्युझीलंडस्थित अनिल उपाध्ये यांनी सांगितले की, भारतीय सण साजरे करण्यामागचा हेतू म्हणजे आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत संस्कृतीचा वारसा पोहोचवणे आणि मातृभूमीशी नातं जपणं आहे.