

त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्रीचा पर्वकाल साधण्यासाठी लाखो भाविक येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दर्शनाचे नियोजन जाहीर केले आहे. महाशिवरात्र उत्सव बुधवारी (दि. 26) साजरा होत आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ४ पासून ते गुरुवारी (दि.२७) रात्री ९ पर्यंत भाविकांना ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मंदिर खुले राहील. पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व प्रकारचे व्ही.आय.पी., प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी देणगी दर्शनही संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.२४) मेहंदी तसेच मंगळवारी (दि. २५) हळदीचा समारंभ होणार आहे. सायंकाळी भक्तिमय बासरी वादन कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी (दि.२६) दुपारी श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघेल. पारंपरिक मार्गानुसार तीर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पूजा करून संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. पालखीदरम्यान शिवतांडव ग्रुपतर्फे अघोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवार्पणमस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत.
गुरुवारी (दि.२७) ओम नटराज अकॅडमी व दीक्षीत यांचे सांस्कृतिक कथ्थक नृत्य सादर होणार आहे. ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.२६) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे. विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चेअरमन न्या. नितिन जिवने, सचिव श्रीया देवचके, विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी दिली