

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषत: श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी भाविकांनी गजबजून जातो.
पर्वतावर जाणाऱ्या भाविक- पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. मागील महिन्यात ब्रह्मगिरी पर्वतावरील बाऱ्यावर दगड पडल्यामुळे भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. तसेच अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दरीत आढळून आला आहे. या वाढत्या घटनांचा विचार करता ब्रह्मगिरीवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे.
ब्रह्मगिरी पर्वताच्या पायऱ्या अत्यंत जीर्ण झालेल्या असून, आवश्यक त्या ठिकाणी नव्याने पायऱ्या बांधणी, रेलिंग तयार करणे गरजेचे आहे. आता कुंभमेळा अवघ्या दीड- दोन वर्षांवर आल्याने विकासकामांसाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मात्र, अद्याप ब्रह्मगिरीकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. मागील सिंहस्थात दीड किमी लांबीचा पायऱ्यांचा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, तो अवघ्या दोन- तीन वर्षांत खराब झाला. संरक्षक दगडी भिंती व लोखंडी पाइपचे रेलिंग तुटले आहे. पायऱ्यांचे दगड पडून तुटफुट झाली आहे. डोंगरावरचे दगड खाली पडत असल्याने अपघात टाळण्यासाठी जाळीने बंदिस्त करण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मगिरी वनविभागाच्या अखत्यारित आहे. वनविभाग आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात कामांना मुहूर्त मिळेल या आशेवर असल्याचे दिसून येते. त्यासाठी वनविभागाने शासनानकडे आराखडा सादर केलेला आहे.
दगडी पायवाट दुरुस्ती व नवीन पायवाट तयार करणे. नवीन सरंक्षक भिंत तयार करणे व आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करणे. नवीन रिटेनिंग वॉल करणे, संरक्षण रेलिंग तयार करणे. विश्रांती स्थळ, पुरातन दगडी निवारास्थान दुरुस्ती करणे. जुन्या तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कुंडाची दुरुस्ती करणे. घनकचरा व्यवस्थापन. नवीन प्रवेशद्वार तयार करणे व माहिती फलक लावणे. सौरदीप बसविणे असा सुमारे १५ कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आलेला आहे.
ब्रह्मगिरी पर्वतावर भेट देणाऱ्या भाविक- पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे हाती घेण्याची गरज आहे. यासाठी विस्तृत माहिती शासनाकडे पाठवण्यात आली आहे.
गोविंदराव मुळे, मूळ गोदावरी पूजक, माजी नगरसेवक