नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित भोंसला मिलिटरी स्कूल, भोसला मिलीटरी कॉलेज आणि गर्ल्स स्कूलतर्फे कारगिल विजयदिना निमित्त युद्धात हौतात्म आलेल्या शूरवीर जवानांना मानवंदना देण्यात आली. वाद्यवृंदाच्या साथीने काढलेली रॅली, पथसंचलन लक्षवेधी ठरले. भरपावसातही शिस्तबध्द संचलन, आकर्षक सजावट व अश्वांचा सहभाग आदीमुळे देशभक्तीचे दर्शन घडले.
रॅलीमध्ये पंधराशेहून अधिक रामदंडीनी सहभाग घेतला. स्कूल आवारातील शहीद स्मारकास प्रमुख अतिथी मानद कॅप्टन योगेंद्र सिंग यादव, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. स्कूल चेअरमन आनंद देशपांडे, कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. विजयप्रसाद अवस्थी, ॲड. सुयोग शहा, नरेंद्र वाणी, आसावरी धर्माधिकारी, वसुधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना हुतात्मा स्मारक(सीबीएस)येथे संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे, संजय पगारे यांच्या हस्ते ध्वज दाखवण्यात आला. अध्यक्ष आनंद देशपांडे आणि मेजर विक्रांत कावळे यांनीही दुसऱ्या गटास ध्वज दाखवला. मुलींच्या रॅलीला स्कूलच्या अध्यक्षा वसुधा कुलकर्णी, मेजर सपना शर्मा यांनी ध्वज दाखवला. कॉलेजतर्फे डोंगरे वसतिगृहाच्या येथून पथसंचलनास सुरवात झाली. गंगापूर रोडवरील पोलिस शहीद चौकाच्या ठिकाणी मालोजीराव भोसले, डॉ. अवस्थी व अँड. शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, उपप्राचार्य डॉ. आर. पी. पाटील आदी उपस्थित होते.
सीबीएस,डोंगरे वस्तीगृहमैदान,महाराष्ट्र पोलिस अकादमी,कॉलेज रोडहून निघालेल्या रॅलीतील पथसंचलनाने आणि रामदंडीच्या शिस्तबध्द संचलनाने सर्वांचेच लक्ष वेधले. कॉलेज- स्कूल प्रवेशद्वाराजवळील स्मारकांच्या ठिकाणापर्यत रॅलीचा मार्ग होता. स्कूलच्या आवारातील शहीद स्मारकास मानवंदना दिल्यानंतर मानद कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांनी रामदंडीना मार्गदर्शन केले.