

नाशिक : दैनिक 'पुढारी' आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर प्रकल्प विभागातील 20 आश्रमशाळांमधील इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गातील सुमारे 2400 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 4) 'पुढारी टॅलेंट सर्च 2025' परीक्षेत सहभाग नोंदविला. टॅलेंट सर्च परीक्षेमुळे मुलांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळावा, स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दैनिक 'पुढारी'तर्फे टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि इंग्रजी या चार विषयांचा दोन तासांचा पेपर शुक्रवारी (दि. 4) सकाळी 11 ते 1 या वेळेत आश्रमशाळांमध्ये घेण्यात आला. परीक्षेसाठी एमपीएससी, यूपीएससीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना 'ओएमआर' शीट पुरविण्यात आले. या शीटवर परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल दिसून आले. 'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षा ही इयत्ता पाचवी आणि आठवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा अनुभव महत्त्वाचा ठरला. 'पुढारी'तर्फे परीक्षेत सहभागी 2400 आदिवासी विद्यार्थ्यांना अडीचशे पानांचे मार्गदर्शक पुस्तक आणि प्रत्येकी दोन सराव प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या होत्या.
परीक्षेसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. संपूर्ण परीक्षा आदिवासी विभाग अधिकार्यांच्या आणि 'पुढारी'चे वार्ताहर आणि प्रतिनिधींच्या देखरेखीखाली सुरळीत पार पडली.
परीक्षेसाठी राजूर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या मागदर्शनाखाली सहायक प्रकल्प अधिकारी तुषार पवार, मनोज पैठणकर, दीपक कालेकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अंबादास बागूल यांनी परिश्रम घेतले. उपक्रमाचे संयोजन राजूर प्रकल्पाचे प्रमोद शिंदे, मंगल जाधव, सुनील पेटारे यांनी केले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, विभाग व्यवस्थापक राजेश पाटील, बाळासाहेब वाजे, शरद धनवटे यांनी उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली.
प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी, राजूर प्रकल्पातील 20 शासकीय आश्रमशाळांच्या प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 40 शिक्षकांना बुधवार, दि.12 मार्च रोजी टॅलेंट सर्च परीक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, प्रशिक्षक रमाकांत जगताप, वाल्मीक चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी मागदर्शन करताना सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ही जन्मजातच असते. मात्र, त्यांच्यातील गुणवत्ता सिद्ध होण्यासाठी पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा ही मैलाचा दगड ठरू शकते.