

नाशिक : विकास गामणे
कोरोना काळात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाण घटले होते. मात्र, आता शस्त्रक्रिया करणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे.
जिल्ह्यात शस्त्रक्रियेबाबत विविध गैरसमजांसह भीतीमुळे पुरुषांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुष प्रधान संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या समाजात कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच आहे. यात नाशिक जिल्हा आदिवासी तालुक्यातील महिला कुटुंब नियोजन कार्यक्रमात आघाडीवर आहे. बिगर आदिवासी तालुक्यात शस्त्रक्रियेचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
वाढत्या लोकसंख्या नियंत्रणासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविल जातो. एक किंवा दोन मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन करावे, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे दिला जातो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागातर्फे लाभार्थ्यास ९०० ते १,३०० रुपये अनुदानही दिले जाते. महिलांसाठी टाक्याची व बिनटाक्याची अशा दोन प्रकारे शस्त्रक्रिया केली जाते, तर पुरुषांसाठी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. आरोग्य विभागाकडून या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही एकाने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्री आणि पुरुष दोघांचीही समान आहे. मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा भार स्त्रियांच्याच खांद्यावर टाकला जात असल्याचे चित्र आहे. वैवाहिक दाम्पत्यामध्ये अपत्यप्राप्तीनंतर कुटुंब नियोजनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जातो. त्यात महिलाच आघाडीवर आहेत. कुटुंब शस्त्रक्रियेचा भार हा महिलांच्या खांद्यावर असला तरी, आदिवासी तालुक्यातील महिलाच यात पुढे येत आहेत. प्रामुख्याने दिंडोरी, इगतपुरी, कळवण, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात महिलांची शस्त्रक्रिया करण्याची टक्केवारी ही इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक आहे.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्रियांनीच करावी, असा समज आहे. त्यामुळे पुरुषांचे शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी जि. प. आरोग्य विभागातंर्गत जनजागृती केली जाते. शस्त्रक्रियेचा कोणतेही दुष्परिणाम नाहीत, त्यामुळे पुरुषांनी पुढे यावे.
डाॅ. हर्षल नेहते, माता- बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद
आदिवासी महिला आघाडीवर राहण्याची कारणे अशी...
रोजगार व स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक
महिलांमध्ये जनजागृतीचा परिणाम
आरोग्य विभागावर महिलांचा विश्वास अधिक