

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या मुख्यालयातील लेखापाल संतोष आमटे यांच्यावर गंभीर गैरव्यवहारप्रकरणी तडकफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले.
कार्यालयीन खरेदीतील अनियमितता, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केलेली बेकायदेशीर कपात, एकाच कामाची दुबार बिले काढणे तसेच महामंडळाची प्रतिमा मलीन करणे असे गंभीर आरोप आमटे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीचा अहवाल आणि अंतर्गत लेखापरीक्षणातील (ऑडिट) धक्कादायक निष्कर्षांच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
यापूर्वी दि. २२ ऑक्टोबर रोजी आमटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, तर दि. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. अखेर सर्व बाबींची पडताळणी करून प्रशासनाने निलंबनाचा बडगा उगारला. विशेष म्हणजे, या आधीही आमटेवर अशा स्वरूपाच्या कारवाया झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिल्ट व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ आणि महामंडळाच्या सेवा नियमावलीनुसार ही प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात आमटेना नियममानुसार केवळ निर्वाह भत्ता दिला जाईल तसेच त्यांचे मुख्यालय जुन्नर येथे निश्चित करण्यात आले आहे.