नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाका येथे वाहनांच्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. कार-जीप-व्हॅनकरिता एका बाजूसाठी १४० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. सोमवार (दि. १) पासून नवीन दर लागू होत असल्यामुळे जिल्हावासीयांचा मुंबई प्रवास महागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर दि. १ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्यास निर्बंध घातले होते. पण निवडणुकांचे सूप वाजताच पुन्हा एकदा शुल्कवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक-मुंबई महामार्गावर घोटी (ता. इगतपुरी) ते अर्जुनली टोलप्लाझा (जिल्हा ठाणे) या ९९.५० किलोमीटरच्या मार्गावर वाहनांसाठी नव्याने शुल्क लागू करण्यात आले आहेत.
घोटी टोलनाका येथे लागू करण्यात आलेल्या नवीन शुल्कानुसार कार व जीपसाठी एका बाजूला १४० रुपये मोजावे लागणार आहेत. स्थानिक व जवळील प्रवासी तसेच स्थानिक व्यावसायिक वाहनांसाठी अनुक्रमे १५ व ३५ रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. हे दर प्रतिवाहन एका बाजूच्या प्रवासासाठीच लागू असणार आहेत. त्यामुळे अगोदरच पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांच्या खिशाला अधिक भुर्दंड बसणार आहे.
घोटी टोलनाका येथे हलक्या मालवाहक वाहनासाठी २४५ व स्थानिक व्यावसायिक प्रवासी वाहनांकरिता ६०, ट्रक आणि बसकरिता ४९०, तर स्थानिक प्रवासी वाहनास १२० रुपये द्यावे लागणार आहेत. दोन एक्सलपेक्षा अधिकचे वाहन व उत्खनन व बांधकामासाठीच्या अवजड मशीनरीसाठी ७८५ रुपये व स्थानिकसाठी १९५ रुपये दर चालकांना मोजावे लागणार आहेत. हे दर एकाच बाजूच्या प्रवासाचे असल्याने चालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.