

नाशिक : मेळा बसस्थानक कॉर्नरवर रसवंती सुरू करण्यावरून परिवहन अधिकारी आणि वकिलांमध्ये शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 च्या सुमारास चांगलीच जुंपली होती. रसवंती याच जागेवर होणार, तुम्ही परिवहन मंत्र्यांना सांगा, नाही तर अन्य कोणाला, तुमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर आहे का? अशी विचारणा भीमदेवी या महिला परिवहन अधिकार्यांनी वकिलांकडे केली.
फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने मेळा बसस्थानक परिसरात परिवहन विभागाकडून पार्किंग जागेत दोन रसवंतींना मंजुरी देण्यात आली आहे. टेंडर काढून रसवंतीला परवानगी देण्यात आल्याने शुक्रवारी (दि.28) रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास बसस्थानक हद्दीत दोन महिला परिवहन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत रसवंतीची उभारणी करण्यात येत होती.
रसवंतीची उभारणी करतांना त्याचवेळी समोरील इमारतीतील वकिलांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर ही जागा पार्किंगची असताना रसवंती कशी उभी करू शकतात, असा आक्षेप घेतला. त्यामुळे महिला परिवहन अधिकारी संतप्त झाल्या. महिला अधिकार्यांनी, तुमच्याकडे काही कायदेशीर कागदपत्रे आहेत का अशी विचारणा केली असता, महिला वकिलांनी 2018 पासून कोर्टात वाद सुरू असल्याने तुम्ही या जागेवर रसवंती उभी करू शकत नसल्याचे सांगितले.
तत्पूर्वी गुरुवारी (दि. 27) देखील हा वाद सरकारवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने वाद सुरू झाला. पोलिसांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत सामोपचाराने वाद मिटविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शुक्रवारी (दि.28) हा वाद अधिकच वाढला. महिला परिवहन अधिकार्यांनी, तुमच्या प्रवेशद्वाराला कुठलीही अडचण येणार नाही अशी भूमिका घेतली, तर महिला वकिलांनीही, आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू, कोर्टातून स्टे ऑर्डर आणू अशी भूमिका घेत विरोध दर्शविला. वकिलांनी या जागेशिवाय अन्यत्र रसवंती उभारा असा सल्ला दिला मात्र यास नकार देण्यात आला.
मेळा बसस्थानक हद्दीत 200 स्क्वेअर फुटाची एक याप्रमाणे दोन रसवंती उभारण्यात येत आहेत. यासाठी परिवहन विभागाकडून टेंडर काढण्यात आले आहे. परिवहन अधिकार्यांनी जागा निश्चित केल्याने तसेच टेंडरमध्ये जागेचा उल्लेख असल्याने जागा बदलता येत नाही. मात्र, आम्ही 10 ते 15 फूट आजूबाजूला सरकण्यास तयार आहोत, तुम्हीही थोडे अॅडजस्ट करा असा सल्ला परिवहन अधिकार्यांनी यावेळी महिला वकिलांना दिला. मात्र त्यास वकील पक्षाकडून नकार देण्यात आल्याने हा वाद सुरू झाला आहे.