

सिन्नर : सिन्नर शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाला दुर्दैवी गालबोट लागले. विसर्जनासाठी गेलेल्या एका कामगाराचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (४०, रा. सिल्वर लोटस स्कूलजवळ, सिन्नर) असे असून ते मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होते. काही वर्षांपासून ते माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचपी गॅस कंपनीत कार्यरत होते.
घटनेची माहिती अशी की, ओमप्रकाश लिल्हारे हे सिल्वर लोटस स्कूलच्या मागे नदीतील डबक्याजवळ गणेश विसर्जनासाठी गेले असताना पाय घसरून खाली पडले. त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्यासोबत धोंडीबा बिन्नर, विकास राठोड तसेच लिल्हारे कुटुंबीयही उपस्थित होते. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार गोसावी पुढील तपास करीत आहेत. गणेश विसर्जनाच्या आनंदात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सिन्नर शहरात शोककळा पसरली आहे.