

नाशिक : जिल्ह्यात ईद-ए-मिलादनिमित्त सोमवार (दि.१६)ची सुटी कायम ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतंत्र आदेश काढत घोषणा केली आहे. त्यामुळे सुटीवरून सर्वसामान्यांमध्ये असलेली संभ्रमवस्था दूर झाली आहे.
अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे सण एकापोठापाठ आले आहेत. त्यामुळे दोन्ही समाजांत सौदार्ह व शांतता राहावी याकरिता ईद-ए-मिलादची सुटी बुधवारी (दि.१८) द्यावी, अशी मागणी होत होती. शासनाने मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये सोमवारची सुटी रद्द करत ती बुधवारी केली आहे. पण अन्य जिल्ह्यांत सुटी बदलण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी शर्मा यांनी तालुकास्तरावर सुटीत बदल करण्याबाबत माहिती जाणून घेतली. त्याअनुषंगाने जिल्ह्यात पूर्वीप्रमाणे ईद-ए-मिलादची सुटी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी ईद व मंगळवारी (दि. १७) अनंत चतुर्दशीची सुटी असेल. तसेच बुधवार (दि. १८)पासून शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये व खासगी आस्थापनांचे कामकाज पूर्ववत होईल. या निर्णयामुळे मागील दोन दिवसांपासून सुटीबद्दल सर्वसामान्य जनतेत असलेली संभ्रमावस्था दूर होण्यास मदत झाली आहे.