

सिडको : पुढारी वृत्तसेवा
शहरारात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइनची कामे सुरू असताना, सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजना नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच असून, शनिवारी (दि. १२) रात्री सिद्धार्थनगर येथील कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनसाठी रस्त्यावरच टाकलेले आडवे पाइप अंधारात न दिसल्याने त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सिद्धार्थ गोरे (३३, रा. उपेंद्रनगर, सिडको) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, नातेवाइकांनी मृतदेह थेट महापालिकेच्या दारात नेत ठिय्या आंदोलन केले.
सिद्धार्थ गोरे एका रुग्णालयात कामाला होते. रात्री काम आटोपून ते मित्र सूर्यवंशी यांच्यासोबत घरी परतत असताना रस्त्यावर टाकलेले पाइप त्यांना अंधार आणि पावसात दिसले नाहीत. त्यामुळे दुचाकी पाइपवर आदळली.
यात दोघेही खाली पडले. यात गोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर सूर्यवंशीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाइकांनी मृत सिद्धार्थ यांचा मृतदेह मनपाच्या प्रवेशद्वारावर आणून निषेध नोंदविला.