नाशिककरांवरील जलसंकट तूर्तास तरी लांबणीवर

काश्यपीतून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग
Gangapur Dam
नाशिक: पोलिस बंदोबस्तात काश्यपी धरणातून ५०० क्युसेस वेगाने विसर्ग करत गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले आहे.(छाया : हेमंत घाेरपडे)

नाशिक : आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत घालत जलसंपदा विभागाने सोमवारी (दि. २४) पोलिस बंदोबस्तात काश्यपी धरणातून ५०० क्युसेस वेगाने विसर्ग करत गंगापूर धरणात पाणी सोडले. यामुळे गंगापूर धरणातील जलपातळी दीड मीटरने वाढली असून, महापालिकेच्या पंपीग स्टेशनमधील जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचण्यातील अडचण दूर झाल्याने नाशिककरांवरील जलसंकट लांबणीवर गेले आहे.

Summary
  • नाशिककरांना पिण्याच्या पाण्यासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता

  • नाशिक शहराला दररोज सरासरी १९.७५ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो.

  • ५०० क्युसेस वेगाने काश्यपीतून गंगापूर धरणाच्या दिशेने पाणी सोडण्यात आले आहे.

मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात सुमारे ८०० दशलक्ष घनफूट इतकी कपात केली गेली. नाशिककरांना पिण्याच्या पाण्यासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असताना महापालिकेला ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण दिले गेले. ३१ जुलैपर्यंत हे पाणी आरक्षण पुरविणे महापालिकेवर बंधनकारक आहे. नाशिक शहराला दररोज सरासरी १९.७५ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. धरणांतील शिल्लक पाणी आरक्षण लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा १८ दिवस कमी पडणार आहे. धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणातील जलपातळी तळाला गेल्याने महापालिकेच्या जॅकवेलपर्यंत पाणी येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे चर खोदून हे पाणी जॅकवेलपर्यंत आणावे लागणार आहे. मात्र, सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आणि त्यानंतर शिक्षण मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेमुळे चर खोदण्याची निविदा प्रक्रिया रखडली. धरणातील मृतसाठा लिफ्ट करून जॅकवेलपर्यंत आणण्याच्या पर्यायावरही प्रशासन विचार करत आहे. दरम्यान, काश्यपी धरणात ४१९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. सदर पाणीसाठा गंगापूर धरणात आणल्यास धरणातील जलपातळी वाढून नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल, अशी सल्लावजा विनंती महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, काश्यपीतून पाणी सोडण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने कोंडी निर्माण झाली होती.

काश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आल्याने धरणातील जलपातळीत काहीअंशी वाढ झाली आहे. त्यामुळे जॅकवेलपर्यंत पाणी येण्यातील अडचण दूर होणार असल्याने नाशिककरांवरील जलसंकट तूर्त लांबणीवर पडले आहे. धरणक्षेत्रात दमदार पावसाची अपेक्षा आहे.

- अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, महापालिका.

दरम्यान, नाशिककरांवरील पाणी संकटाबाबत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करत या वादावर तोडगा काढला. सोमवारी (दि.२४), ५०० क्युसेस वेगाने काश्यपीतून गंगापूर धरणाच्या दिशेने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत गंगापूर धरणात काश्यपीतील पाणी पोहोचले असून धरणातील जलपातळी दीड मीटरने वाढून ६२५ वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचण्यातील अडचणी दूर झाल्याने नाशिककरांवरील जलसंकट तूर्त टळले आहे

स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे. काश्यपी धरणातून गंगापूर धरणात ५०० क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीपातळीत काहीशी वाढ होणार आहे.

- सोनाली शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news