

मालेगाव : शहरातील पवारवाडी भागातील केजीएननगर येथे दुसऱ्याशी झालेल्या भांडणात ‘तू मला मदत का केली नाही’ या कारणातून झालेल्या वादातून भावानेच भावावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. यात गुडघ्याला गोळी लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या भावासह तिघांविरुद्ध पवारवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाहीद अख्तर शकील अहमद याचे दुसऱ्याशी भांडण झाले होते. भांडणाच्या वेळी त्याचा भाऊ अनिस अहमद शकील अहमद याने मदत केली नव्हती. हा राग मनात धरून शाहीद अहमदने दोन अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने (नाव समजू शकले नाही) अनिस अहमदच्या घरी जाऊन त्याच्याशी वाद घातला होता. वादात शिवीगाळ करत, मै तुझे मार दुंगा म्हणत त्याने गावठी कट्ट्यातून भाऊ अनिस अहमदवर गोळीबार केला. यात डाव्या पायाच्या गुडघ्याला बंदुकीची गोळी लागून अनिस गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवारवाडी पोलिसांनी शाहीद अहमदसह तिघांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.