नाशिकच्या तरुणाईवर अमली पदार्थांचा विळखा

आज जागतिक अमली पदार्थविरोधी दिन: नशेचा बाजार फोफावतोय
नाशिकच्या तरुणाईवर अमली पदार्थांचा विळखा
Published on
Updated on

नाशिक : निल कुलकर्णी

शहर व परिसरातील सुमारे चार हजारांहून अधिक मुले अमली पदार्थांचे व्यसन करत असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. महाविद्यालयीन युवावर्गासह शाळकरी मुलेही अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची माहिती व्यसनमुक्तीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिली.

Summary

हेही धक्कादायक..!

नाशिकमधील वडाळा, अशोकामार्ग, जत्रा हॉटेल परिसर, जुने नाशिक हा परिसर ड्रग्ज विक्रीचा मोठा अड्डा.

व्यसनाच्या विळख्यात ओढण्यासाठी मुलांना दिली जातात प्रलोभने, स्वस्त अमली पदार्थ, पैसे कमवण्याचेही आमिष. 'विकत घ्या आणि हाच धंदा करून पैसा कमवा' असेही दिले जाते प्रलोभन.

२६ जून जागितक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून पाळला जातो. अमली पदार्थच्या प्रतिबंधात गुंतवणूक करा, अशी यावर्षीची संकल्पना आहे. नाशिकसह जिल्ह्यात एक ग्रॅमहून कमी वजनाच्या नशेच्या पावडरची ड्रग्ज पेडलरकडून (चोरीचा माल किंवा मादक द्रव्य विकणारी व्यक्ती) ८०० ते ते १,५०० या दराने विक्री होते. शहर व परिसरात पाच हजार मुले व्यसन करत असतील आणि ते दिवसात किमान एकवेळा ड्रग सेवन करत असतील, असे गृहीत धरले, तर दिवसाला सरासरी एक हजार रुपये याप्रमाणे ड्रग्जची दिवसाची लाखोंची खरेदी-विक्री होत असल्याचे याविषयीचे तज्ज्ञ सांगतात. हे हिमनगाचे टाेक आहे. शहरातील ड्रग्ज सेवन करण्याचे प्रमाण याहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती व्यसनमुक्ती करणाऱ्या एका डॉक्टरांनी दिली. (INTERNATIONAL DAY AGAINST DRUG ABUSE and Illicit Trafficking)

INTERNATIONAL DAY AGAINST DRUG ABUSE and Illicit Trafficking
file photo

सांकेतिक भाषेत मालाची ऑर्डर केली की, पुढील ५ ते १० मिनिटांत व्यसनाधीन व्यक्तीच्या दारात पाकीट पोहोचवले जाते. यावरून पेडलर्स, डीलर्स यांचे नेटवर्क किती सशक्त आहे याची कल्पना येते. गंभीर बाब म्हणजे शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्यांचे आर्थिक उत्पन्न शून्य असते, त्यांना जर दिवसाकाठी एक ते दीड हजार रुपये केवळ व्यसनासाठी लागत असतील, तर ते मिळवण्यासाठी त्यांच्याकडून गुन्हेगारीच्या घटनाही घडत जातात. व्यसनांसाठी असा युवावर्ग कुठल्याही थराला जातो.यातूनच गुन्हेगारीचा आलेख वाढत जातो, असेही तज्ज्ञ सांगतात.

नाशिक शहरात अमली पदार्थांच्या व्यसनात अडकलेल्या तरुणाईचे प्रमाण गेल्या काही वर्षात प्रचंड वाढले आहे. परिणामांचा विचार न करता युवावर्ग अमली पदार्थांचे सेवन करतो. असल्या भयंकर क्षणिक आनंदापेक्षा छंद, बागकाम, चित्र, संगीत, माइंडकूलनेस ध्यान, यातून तरुणाईची ऊर्जा योग्य रीतीने बाहेर पडल्यास ती वाईट मार्गावर जाणार नाहीत. मूल्याधिष्ठित संस्कार, पालकत्वही यासाठी महत्त्वाचे ठरते.

- डॉ. मृणाल भारद्वाज, मानसशास्त्रज्ञ

भावी पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून काढायचे असल्यास मूल्याधिष्ठित शिक्षण, घरातील संस्कार आणि आध्यात्मिक बुद्ध्यांक वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ व्यक्त करत आहे.

नाशिकमध्ये सध्या २५ ते ३० तज्ज्ञ, डॉक्टर्स तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून काढून पुनर्वसनाचे काम करतात. त्यांनाही ड्रग्ज पेडलर आणि गर्दुल्ल्यांकडून त्रास होतो, अशी माहिती व्यसनमुक्तीवर काम करणारे तज्ज्ञ, डॉक्टर्स देतात.

अमली पदार्थाविरोधात पोलिस विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत मोठी वाढ झाली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी ड्रग्जविरोधात दोन ते तीन कारवाया होत आता त्याची संख्या वाढली आहे. गेल्या पाच महिन्यांत पोलिस विभागाने आठ ठिकाणी कारवाया करून संशयिताविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाव्दारेही यासंबंधी उत्तम कामगिरी सुरू आहे. अमली पदार्थ सेवन, विक्री विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी व्हॉटस‌्अॅप नंबर प्रसिद्ध केेले आहे. नागरिकांनी त्यावर तक्रार नोंदवावी, त्याव्दारे संदेश येताच तत्काळ कारवाई केली जाते.

- प्रशांत बच्छाव, उपायुक्त, गुन्हेशाखा, नाशिक

गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये अमली पदार्थ्यांचे व्यसन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. व्यसनाधीन व्यक्तीला त्यापासून बाहेर काढण्यासाठी संबंधित मुले आणि त्यांच्या पालकांचाही व्यसनमुक्ती उपचारात समाविष्ट करून घेतो. प्रेरणादायी संवादा((मोटिव्हेशल इनहान्स थेरपी) नंतर डिटॉक्सिफिकेशन, समुपदेशन, औषधोपचार या माध्यमातून बाहेर काढले जाते. गर्दव्यसनीही व्यसनातून बाहेर पडून चांगले जीवन जगू शकतो.

-डॉ. अमोल चं. पुरी,·मानसोपचार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news