

नाशिक : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी (दि.१२) हंगामातील सर्वात निच्चांकी (७.८ अंश सेल्सिअस) तापमान नोंदविणाऱ्या नाशिकमध्ये शनिवारी देखील ८.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. याशिवाय निफाडही गारठलेलेच असून, निफाडमध्ये ६.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील काही दिवस नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात धुळे आणि अहिल्यानगरचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला असून, त्यापाठोपाठ निफाड आणि नाशिक थंड शहर म्हणून पुढे आले आहे.
आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडत असल्याने, नाशिककर सकाळच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, हाडे गोठविणाऱ्या थंडीमुळे नाशिककरांना दिवसभर उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे. थंडीचा हा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.