

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये एका एम्ब्राॅयडरी कंपनीत धक्कादायक तथा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. मॅनेजर आणि सुपरवायझर अशा दोघांनी मिळून एका महिला कामगाराचा विनयभंग तर केलाच, शिवाय अश्लिल भाषेत संवादफेक करून तिला ओटीपोटात लाथांनी मारहाण केली. दोघांच्या तडाख्यातून निसटलेल्या या महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली.
कंपनीत महिला कामगाराला मारहाण झाल्याची माहिती मिळताच डोंबिवली भाजपाच्या पदाधिकारी सुहासिनी उर्फ मनीषा राणे यांनी संबंधित कंपनीच्या ठिकाणी जाऊन महिलेकडून माहिती घेतली. कामगार महिलेची व्यथा ऐकून मनीषा राणे यांनी या प्रकरणात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून मॅनेजर आणि सुपरवायझरला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याने पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री 1.20 वाजता कंपनीतून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली.
डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये असलेल्या राईस मील कम्पाऊंडमधील एस. एस. एम्ब्राॅयडरी कंपनीत बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी एम्ब्राॅयडरी कंपनीतील सुपरवायझर विजय दौलत बेडल (45, रा. वांगणी) आणि मॅनेजर रणजित भगवान आगवणे (47, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) या दोघांना अटक केली आहे.
डोंबिवलीत कुटुंबीयांसह राहणारी 36 वर्षीय तक्रारदार महिला एस. एस. एम्ब्राॅयडरी कंपनीत एम्ब्राॅयडरीचे काम करते. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडित महिला कंपनीत काम करत असताना तेथे मॅनेजर रणजित आगवणे आला. त्याने पीडित कामगार महिलेला वाढीव काम देणार नसल्याचे बजावले. या विषयावरून मॅनेजर आगवणे याने वाद घालून अश्लिल शब्दांत उल्लेख करून, गैरकृत्य करून या महिलेच्या ओटीपोटीत तीनदा लाथा झाडून तिचा विनयभंग देखिल केला. याच दरम्यान तेथे आलेल्या सुपरवायझर विजय बेडल यानेही कामगार महिले संदर्भात अत्यंत अश्लिल शब्दांचा वापर करून तिचा अवमान केला.
ही माहिती मिळताच भाजपाच्या महिला पदाधिकारी मनीषा राणे यांनी कंपनीतील दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर तात्काळ अटकेच्या कारवाईची मागणी केली. पोलिसांनी मध्यरात्री कंपनीत जाऊन मॅनेजर रणजित आगवणे आणि सुपरवायझर विजय बेडल या दोघांना अटक केली. या दोघांच्या विरोधात अश्लील शब्दफेक, अमानुष मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.