ओझर : येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छताची दुरवस्था झाल्याने वर्गांमध्ये गळती लागली आहे. अशा परिस्थितीतीच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. शाळेच्या भिंतींना तडे जात आहेत, त्यामुळे या शाळेतील वर्ग विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक बनत आहेत.
सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, पोषण आहार, मोफत पुस्तके अशा अनेक सोयी सरकारमार्फेत विद्यार्थ्यांना दिल्या जातात. एवढंच नाही तर सरकारनं जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारावा, यासाठी देखील अनेक पाऊले उचलली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगला दर्जा मिळावा आणि विद्यार्थ्यांना या शाळेत उत्तम शिक्षण घेता यावं, यासाठी अनेक पाऊलं उचलली जात आहेत. अशातच आता ओझर शहरात एका जिल्हा पिरषदेच्या उर्दू शाळेला गळती लागल्याचं समोर आलं आहे. शाळेच्या छतांमधून आणि भितींमधून पावसाचं पाणी पडत आहे. या शाळेतील वर्गखोल्यांना देखील तडे गेले आहेत. तसेच छत देखील कोसळण्याच्या अवस्थेत आहे. वर्गखोल्यांमध्ये पावसाच्या पाण्यासाठी बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.पावसामुळे जमिनीवर पाणी साचलं आहे. त्याच पाण्यात विद्यार्थ्यांना वाट काढून बसवण्यात आले आहे. या सर्व प्रकरामुळे पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगल्या वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही विद्यार्थ्यांना का शाळेत पाठवावे, असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे.
ओझर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा कौलारू असल्यामुळे गळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस येत असल्याने भिंती देखील ओलसर झालेल्या आहे. त्या केव्हाही पडण्याचा धोका आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अन्सार कुरेशी, पालक, ओझर.