

देवळाली कॅम्प (नाशिक) : नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प से सिद्धी तक' या अभियानाच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यास केंद्रीय नागरी उडयन आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकारची जनकल्याणाची कामगिरी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
देवळाली विधानसभा मतदारसंघात आयोजित मेळाव्यात ना. मोहोळ यांनी नाशिक शहर, नाशिक आणि नाशिक दक्षिणच्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 'विकसित भारत २०४७'चा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी देशात वेगाने सुरू असलेल्या विकासकामांबद्दल आणि जनहिताच्या योजनांबद्दल माहिती दिली. सेवा, विकास, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण अशा विविध आघाड्यांवर मोदी सरकारने भरीव कामगिरी केली आहे. मोदी सरकारच्या लोकहिताच्या कामांचा होणारा सकारात्मक परिणाम देशातील प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांचे समर्पण ही पक्षाची खरी ताकद असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भारतीय जनता पक्ष देशातील मोठ्या शहरांपासून ते दुर्गम भागापर्यंत पोहोचला असून, आगामी काळात नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नाशिक दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हा सरचिटणीस शरद कासार ,बाजीराव भागवत, कन्हैया साळवे, सुनील अडके, पंडित आवारे, सुयोग वाडेकर, जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.