

नाशिक : राज्यात महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर शनिवारी (दि.7) विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 15 पैकी 14 आमदारांनी शपथ घेतली. निफाड मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर हे रविवारी (दि. 8) शपथ घेणार आहेत.
गुरुवारी (दि. 5) मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पाठोपाठ, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, शनिवारी विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. सत्ताधारी पक्षातील आमदार विविध रंगांच्या फेट्यांमध्ये विधिमंडळ परिसरात आल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेने (शिंदे गट) चे आमदार भगव्या रंगाच्या फेट्यांमध्ये, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार गुलाबी रंगाच्या फेट्यांमध्ये दिसले. पहिल्या दिवशी सत्ताधारी गटातील 200 आमदारांनी शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आमदारांना शपथ दिली. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 14 आमदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील निफाडचे आमदार दिलीप बनकर हे प्रकृती अस्वस्थतेमुळे शनिवारी शपथविधीला हजर नव्हते. ते रविवारी शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातून सर्वप्रथम सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शपथ घेतली. त्यांची नियुक्ती तालिका अध्यक्षपदी करण्यात आली असल्याने आमदारकीच्या शपथविधीत त्यांचा राज्यातून तिसरा, तर जिल्ह्यातील आमदारांमध्ये पहिला क्रमांक लागला. कोकाटे यांच्यानंतर 11 व्या स्थानी नरहरी झिरवाळ, त्यापाठोपाठ छगन भुजबळ, दादा भुसे, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, डॉ. राहुल आहेर, सुहास कांदे, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नितीन पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सीमा हिरे यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे भाजपचे नेते आणि जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन, भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनीही संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतली.