नाशिककरांनो काळजी घ्या! आकडा वाढतोय, तीन आठवड्यांंत डेंग्यूचे ३०४ नवे रुग्ण

बाधितांचा आकडा ८८० वर; वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
Dengue
डेंग्यू प्राणघातक आहेPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत असल्याने शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांतच डेंग्यूचे ३०४ नवे रुग्ण आढळले असून, बाधितांचा एकूण आकडा ८८० वर पोहोचला आहे. डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक ठरत आहे.

Summary

शहरात डेंग्यूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. जानेवारीपासूनच डेंग्यूचा डंख शहराला लागला. मात्र मे महिन्यात त्याचा प्रादुर्भाव अचानक वाढल्याचे दिसून आले. या एकाच महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले. या वाढत्या प्रादुर्भावाची जाणीव महापालिका प्रशासनाला होईपर्यंत जूनमध्ये १६५ नवे रुग्ण आढळले आहेत.

संततधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरल्याने जुलैत सर्वाधिक ४३४ जणांना या आजाराची बाधा झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयातील सेंटिनल लॅबमध्ये डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाला. हजारावर रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी प्रलंबित राहिले होते. पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी आरोग्य प्रशासनाची बैठक घेत युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रलंबित डेंग्यू चाचण्यांचा प्रश्न सुटला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत शहर परिसरात युद्धपातळीवर डेंग्यू निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. डासांची उत्पत्तीस्थळे शोधण्यासाठी मलेरिया विभागामार्फत १८६ पथके तयार केली गेली. या पथकांमार्फत घरांना भेटी देत डासांची उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली. या मोहिमेनंतरही ऑगस्टच्या गेल्या तीन आठवड्यांत तब्बल ३०४ नवे डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जानेवारी ते २४ ऑगस्ट या कालावधीतील डेंग्यू रुग्णसंख्या ८८० वर पोहोचल्याने वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे.

चिकुनगुनियाचाही प्रादुर्भाव वाढला

डेंग्यूबरोबरच शहरात चिकुनगुनियाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत शहरातील ४० जणांना चिकुनगुनिया आजाराची लागण झाली आहे. तापसदृश आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉलरा, अतिसार, काविळ यांसारख्या जलजन्य आजारांच्या साथीचा प्रादुर्भावही वाढत आहे. महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थळे घर परिसरात निर्माण होणार नाहीत, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळताच लगतच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.

डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख, महापालिका, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news