

सुरगाणा | वणी -बोरगाव- सापुतारा महामार्गावरील बोरगाव हे राष्टीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून महामार्गावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. परंतु याठिकाणी असलेली रुग्णवाहिका आजारी असल्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी गैरसोय होत आहे. ॲम्बुलन्सची बॅटरी खराब असल्याने दे धक्का असा प्रकार सुरू आहे.
बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स ची बॅटरी खराब असल्याने सध्य स्थितीत ही अॅम्बुलन्स रुग्णांना पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना अचानक रस्त्यावर बंद पडली तर नाहक रुग्णांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागणार आहे. नेहमी या गोष्टीचा पाठपुरावा करून सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी यांनी ही लक्ष दिले पाहिजे.
कुणावर कधी काय आपत्ती येईल सांगता येत नाही, अशात रुग्णवाहिका सुस्थितीत असावी एवढीच मागणी नागरिकांची आहे. यामुळे परिसरातील सागर शेवाळे, पुंडलिक धुळे, राजू बागुल, सुरेश गांगुर्डे, सुरेश पवार आदी ग्रामस्थांनी रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.