

येवला (नाशिक) : संतोष घोडेराव
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची माहिती महत्वाची पुस्तके उपलब्ध होणे हे तसे अवघडच असते. त्यामुळे पैशाअभावी कित्येक विद्यार्थी आपली स्वप्ने अर्धवट सोडून देत अडचणींना डोळसपणे सामोरे जातात. स्वतःच्या बालपणातील संघर्षातून प्रेरणा घेऊन एका शिक्षकाने या विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तकांची ज्ञानगंगा उघडली अन् शेकडो तरुणांना आपले स्वप्न साकार करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
चिचोंडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सोमनाथ श्रीधर खळे यांच्या दूरदृष्टी मुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची दारे खुली झाली, अन् अवघ्या सहा वर्षातच 180 हून अधिक मुले-मुली सरकारी सेवेत रुजू झाली आहेत. यशस्वी मुले आज त्यांच्या कुटुंबाचा आधारवड बनली आहेत.
Only Competitive Exam
तालुक्यातील निमगाव मढ येथील सोमनाथ खळे यांनी २०२० मध्ये “Only Competitive Exam” हा ऑनलाइन ग्रुप सुरू करत “समीक्षा बुक बँक” ची स्थापना केली. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षांची माहिती, जाहिराती व अद्ययावत मार्गदर्शन पोहोचावे या उदात्त हेतूने पुस्तकांच्या कमतरतेमुळे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची सोय त्यांनी केली. “समीक्षा बुक बँक” मार्फत आजतागायत शेकडो विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना ही या उपक्रमाचा लाभ मिळत आहे.
समीक्षा बुक बँकमुळे येथे रुजू झाले विद्यार्थी
शिक्षकाच्या या धडपडीचे यश आकडेवारीत पाहिले तर दिपून जावे असे आहे. या ग्रुप व बुक बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत ६५ विद्यार्थी पोलिस दलात, १० रेल्वे सेवेत, २४ आर्मीमध्ये, १२ ग्रामसेवक, ८ शिक्षक, ६ जिल्हा परिषदेत, ३ एमपीएससी मधून अधिकारी, ३ क्लार्क, २ पोस्ट ऑफिसमध्ये तर काही विद्यार्थी नीटच्या तयारीतून वैद्यकीय शिक्षणासाठी निवडले गेले आहेत. इतकेच नव्हे तर अंध असलेले जालना येथील रामकिसन सुममार यांनाही या ग्रुपचा लाभ झाला आहे.
पुस्तकांचा खजिना खुला
खळे गुरुजी यांचे बालपणही संघर्षमयच ग्रामीण पार्श्वभूमीमुळे आणि परिस्थिती अभावी त्यांना स्वतःलाही पुस्तके खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र नवोदय विद्यालय, खेडगाव येथे शिकताना खिल्लारे सर यांनी ग्रंथालयातून पुस्तकांची सोय करून दिली. त्यातूनच प्रेरणा घेत खळे गुरुजींनी आज असंख्य विद्यार्थ्यांना पुस्तकांचा खजिना खुला करून दिला आहे.
या उपक्रमात यांचाही खारीचा वाटा
या उपक्रमात त्यांना साथ देणारे शिक्षक पुंजाराम पगारे, प्रवीण गवई, अमित कुलगुंडे, गोकुळ वाघ, शरद अहिरे, संतोष सोनवणे, संतोष बुधवंत, पांडुरंग भालेराव, बाबासाहेब धीवर या सर्वांच्या सहकार्यामुळेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना फायदा होत आहे.
उपक्रमामुळे अभिमानाने शासकीय सेवेत
या उपक्रमातून घडलेले यशस्वी चेहरे बघितले की आनंद दुणावतो असे खळे म्हणतात. पूनम पडवळ (लोहमार्ग पोलिस, पुणे), श्रुती गाजरे (मीरा-भाईंदर पोलिस), विकास वाघ (MPSC क्लार्क), योगेश्वर विंचू (MPSC क्लासवन अधिकारी), विद्या गांगुर्डे (जिल्हा परिषद), विशाल लभडे (Indian Airforce), आरती चोळके (India Post) , योगेश गांगुर्डे (रेल्वे अधिकारी) असे असंख्य विद्यार्थी आज अभिमानाने सेवा बजावत आहेत.
--------
आज जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबासाठी सोमनाथ खळे हे फक्त शिक्षक नाहीत, तर “मार्गदर्शक दीपस्तंभ” आहे. खळे सरांचे हे कार्य म्हणजे केवळ शैक्षणिक मदत नसून ही एक ज्ञानसेवा आहे. जी मुलांना उभारी देत आत्मविश्वास जागवते आणि स्वप्नांना उड्डाण देते. आज प्रत्येक शिक्षकाने यापासून प्रेरणा घ्यावी, असे हे कार्य आहे. खळे सरांची ही धडपड म्हणजे ग्रामीण भागातील घराघरात पोहोचणारी “ज्ञानगंगा”च आहे.
तुळशिदास खिरोडकार, अकोला
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा माहिती मिळावी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून चालू केलेला हा छोटा उपक्रम असून याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे"
सोमनाथ खळे,गुरुजी