

नाशिक : खासगी कोचिंग संस्था आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी टाय-अप व इंटिग्रेटेड पद्धतीला विरोध करणारी घोषणा स्वागतार्ह आहे, यामुळे विद्यार्थी नियोजित महाविद्यालयीन वेळात वर्गात बसतील आणि गरीब विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील मान्यवर पालकांनी दिल्या.
शिक्षणसंस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही म्हणून खासगी क्लास लावावे लागतात, अशी ओरड विद्यार्थी करतात, तर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीच येत नाही, तर शिकवणार कुणाला असे प्राध्यापकांचे म्हणणे असते. वास्तविक अनेक महाविद्यालये आणि खासगी क्लासेस यांचे साटेलाटे गेली कित्येक वर्षे सुरू असून, याचा फटका गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना बसत आहे. यात केवळ ग्रामीण भागातील नवीन महाविद्यालय आणि कोचिंग संस्था यांचे टायअप नसून शहरातील नामांकित शिक्षण संस्थांचेही कोचिंग क्लासेसचे टायअप असल्याचे भीषण वास्तव आहे. महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांच्यातील करार मोडून काढण्यासाठी नवीन कायदा आणणार, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (दि. १६) विधानसभेत केली. या निर्णयावर खासगी काेचिंग क्लास संघटनांचे पदाधिकारी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
स्तुत्य निर्णय! अशा टाय-अप मुळे विद्यार्थी कॉलेजवेळेत बाहेरील क्लासेसला जातात. ४० ते ५० हजार शिक्षकांच्या वेतनावर सरकार करत असलेला पैसाही अध्यापन न करता व्यर्थ जातो. यावर अंकुश आणण्यासाठी आता ऑनलाइन लाइव्ह हजेरी घेतली जाणार आहे. ७० टक्के विद्यार्थ्यांची वर्षभरात हजेरी नसल्यास त्या विद्यार्थ्याला 'एचएससी' बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट होता येणार नाही.
सचिन जोशी, शिक्षण अभ्यासक
इंटिग्रेटेड, 'टाय-अप'ला सुरुवातीपासूनच विरोध : घोषणेमुळे अनेक अपप्रवृत्तींना आळा बसण्याबरोबरच क्लासेस क्षेत्राला सरकार दरबारी राजमान्यता मिळणार आहे. कॉलेजचे व क्लासचे अध्यापन स्वतंत्र हवे. एखाद्या विषयातील संकल्पना महाविद्यालयात आकलन न झाल्यास ती क्लासमध्ये समजते. या प्रकाराला पहिल्यापासूनच विरोध आहे. शाळा कॉलेजेसमध्ये अध्यापनासाठी नोकरी करणाऱ्या तरीही खासगी क्लासेस घेणाऱ्या अध्यापकांना संघटनेचा विरोध आहे.
जयंत मुळे, अध्यक्ष, जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना
महाविद्यालयांमध्ये केवळ प्रवेश घेऊन खासगी क्लासेसमध्ये शिक्षणाचा प्रकार मोडीत निघेल. ग्रामीण विद्यार्थी शहरातील संस्थेत प्रवेश घेऊन चांगल्या करिअरचे स्वप्न बघतात. त्यांना न्याय मिळणार आहे. असे टायअप आढळ्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी.
शुभम चव्हाण, विद्यार्थी