

सातपूर : सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर नगर येथे बुधवारी (दि. १६) रात्री दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणावर मोकाट कुत्र्याने झडप घेत चावा घेतल्याची घटना घडली.
सावरकर नगर आणि अशोकनगर या परिसरातही आणखी दोघांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. केवळ दोन दिवसांत सातपूर परिसरात श्वानदंशाच्या दहा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
सातपूरमधील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. औद्योगिक वसाहतीत रात्रपाळीला जाणारे किंवा कामावरून घरी परतणारे कामगार या मोकाट कुत्र्यांच्या टोळीच्या दहशतीत प्रवास करत आहेत. कुत्र्यांकडून वाहनांचा पाठलाग केल्यामुळे अनेकवेळा दुचाकीस्वार अपघातग्रस्त होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
रस्त्याच्या वळणावर दुचाकीची गती थोडी केली असता, अचानक मागून आलेल्या कुत्र्यांने पायाला चावा घेतला.
जितेन रजक, नागरिक, सातपूर, नाशिक.