

इंदिरानगर (नाशिक) : वडाळारोड येथील जेएमसिटी कॉलेज समोरील अल मदिना कॉलनीत घराबाहेर खेळणाऱ्या आर्यन संदीप विधाते (७) या बालकावर तीन ते चार कुत्र्यांनी केला हल्ला करत गंभीर जखमी केले. कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेलाही कुत्र्यांनी चावा घेतला. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा मनपाच्या संबंधित विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात कुत्रे सोडून आंदोलन छेडू, असा इशारा नागरिकांनी दिला.
कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात आर्यनचे हात, कान व पाठीवर मोठ्या जखमा झाल्या आहे. त्याला शेजारी राहणारी रेश्मा शेख यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांनी त्यांच्याही डाव्या हातास चावा घेतल्याने ती महिला जखमी झाली. या दोन्ही जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत नागरिकांत संतापाची लाट आहे. नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भटके कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर त्या कुत्र्यांना आम्ही मनपात अधिकाऱ्यांच्या दालनात सोडत आंदोलन करणार असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला.