

नाशिक: घटलेली निर्यात, वाढती आयात यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने देशातील स्टीलच्या किमती पाच वर्षांच्या नीचांकावर आल्या आहेत. स्टीलची किंमत ४७ के ४८ हजार प्रतिटन इतक्या आहेत. परंतु यामुळे बड्या रिअल इस्टेट प्रकल्पांच्या बांधकाम खर्चात किमान दहा टक्के बचत होणार आहे. तसेच उड्डाणपूल आणि महामार्ग उभारणाऱ्या कंपन्यांना लाभ मिळणार आहे.
हॉट रोल्ड कॉइलची (एचसीआर) किंमत ४७,१५० रुपये असून, रिबारची किंमत ४६ हजार ५०० ते ४७ हजार रुपयांदरम्यान फिरत आहे. यापूर्वी २०२० मध्ये एचआरसीची किंमत ४६ हजार आणि रिबारची किंमत ४५ हजार प्रतिटन होती. कोविडमुळे मागणी घटल्याने त्यावेळी स्टीलची किंमत घटली होती. केंद्र सरकारने विविध उपाय अवलंबल्यानंतरची चीनसह विविध देशांमधून होणारी आयात वाढली आहे. त्यातच स्टीलची निर्यात घसरल्याने देशांतर्गत स्टीलचा साठा वाढला आहे. त्याचा परिणाम किंमत घटण्यात झाला आहे.
या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी स्टील मंत्रालयाने २७ ऑक्टोबर रोजी स्टील आयातदारांची बैठक आयोजित केली आहे. स्टीलची किंमत कमी असल्याने आयात वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतात ७ लाख ९० हजार टन स्टीलची आयात करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात ६ लाख ९० हजार टन स्टील आले होते. सलग सहाव्या महिन्यात भारत स्टीलचा आयातदार बनला आहे. कोरिया, रशिया, इंडोनेशियातून स्टील आयात वाढली आहे. तर, गतवर्षीच्या तुलनेत चीन, जपान, व्हिएतनाम आणि तैवान मधून होणारा स्टीलचा पुरवठा घटला आहे.
विशेष म्हणजे, तयार स्टीलच्या किमती घटल्या असल्या तरी, कच्च्या मालाच्या किमतीत तितकी घट झाले नाही. लोह खनिजाच्या किमती सुमारे ४ हजार ८०० ते पाच हजार रुपये टन या पातळीवर स्थिर आहेत. गत वर्षभरातील किमतीचा हा नीचांक ठरला आहे. कोकिंग कोळसा मालवाहतूक खर्चासह २०५ डॉलर प्रतिटनावर आहे. हा गत महिनाभरातील नीचांकी दर आहे. मालाची उपलब्धता, तुलनेने बेताची मागणी यामुळे स्टीलची किंमत नजीकच्या काळात कमी राहण्याचा अंदाज आहे.