

सिडको : गोविंदनगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकवरून घरी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेला भटक्या श्वानाने चावा घेतला. यात मीनाक्षी सोनार यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे.
सिडकोसह गोविंदनगर, सदाशिवनगर व स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण परिसरात तसेच अंबड भागात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. आतापर्यंत यशवंत मोतीराम मगर, प्रवीण सूर्यवंशी या ज्येष्ठांवर श्वानांनी हल्ला केला आहे. याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करुनही प्रभावी कार्यवाही होत नसल्याने संतत्प प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये आठवड्यातून किमान एक दिवस मोकाट श्वान पकडण्यासाठी पथके तैनात करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच, या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे यांसह सहकाऱ्यांनी दिला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भितीच्या छायेत जगत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक आहे. समस्या कायम राहिल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
कैलास चुंभळे, सामाजिक कार्यकर्ता, नाशिक