

नाशिक : भारतीय संस्कृतीचे सार असे वर्णन केली जाणारी श्रीमद्भगवद्गीता आणि नाट्यशास्त्रातील अभिजात तत्त्वज्ञान मांडणारे 'भरतमुनींचे नाट्यशास्त्र' यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असून, हा जागतिक वारसाच आहे. आता केवळ ते सुवर्णरेखांनी अधोरेखित झाले आहे, अशा प्रतिक्रिया वेद अभ्यासक, रंगकर्मींनी दिल्या.
जीवन कसे जगावे हे श्रीमद्भगवद्गीता शिकवते. या निर्णयाने जागतिक स्तरावरील सर्वांमध्ये भगवद्गगीतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सुनीता विल्यम्स अंतराळात गणेशमूर्ती आणि श्रीमद्भगवद्गीता सोबत घेऊन संशोधन करायला गेल्या होत्या. हा एकमेव ग्रंथ असा आहे की स्वत: गोपालकृष्णांनी सांगितलेला उपदेश आहे. त्यामुळेच तो हिंदू धर्माचा पाया मानला गेला. हा जागतिक नव्हे तर, आकाशगंगे (गॅलेक्झी) तील वारसा आहे.
शंतनू महाराज लोहोणेरकर, श्रीमदभागवतकार, नाशिक
भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा केवळ एक प्राचीन ग्रंथ नाही, तर भारतीय लोकांचे विचार, संवेदना, आणि संघर्ष यांना स्वरूप देणारा सांस्कृतिक दस्तऐवज आहे. 'युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश ही गौरवाची बाब आहे. नाट्यशास्त्र लोकांच्या कथा बोलक्याच करायचे शास्त्रशुद्ध आणि समांतर राजकीय साधन! ते सत्ता, अन्याय, सामाजिक भेदभाव याविरुद्ध आवाजही देते.
प्राजक्त देशमुख, रंगकर्मी, नाट्यलेखक, दिग्दर्शक
वारसा यादीत समावेश झाल्यामुळे अतिव आनंद आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे अभिजात आहेच. आता त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. त्यामुळे आधीपासूनच समृद्ध असलेल्या नाट्यशास्त्राची अभिजातता सुवर्णरेषांनी अधोरेखित झाली आहे. निणर्यामुळे भारतीय संस्कृतीच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला जाणार आहे.
सुनील ढगे, प्रमुख कार्यवाह, अ. भा. मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा
मनस्वी आनंद झाला. प्राचीन काळापासूनचा वारसा आहे. आता युनेस्कोच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले. खरं तर फार पूर्वीच या ग्रंथांना हे स्थान मिळावयास हवे होते. पण उशिरा का होईना अखेर योग्य निर्णय झाला. जागतिक पातळीवर श्रीमद्भगद्गीता व भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे अभ्यासले जातील आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जगासमोर आपली संस्कृती, संस्कार आणि विचाराची महती कळेल.
प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष. अ. भा. नाट्य परिषद, शाखा, नाशिक
अभिमानास्पद बाब आहे. यापूर्वी भगवद्गगीतेचे कित्येक भाषांमध्ये भाषांतर झाले असून, मानवी जीवन जगण्याचे मूलभूत तत्त्वज्ञान म्हणून त्याकडे पाहिले जाते. भारतमुनींचे नाट्यशास्त्र भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व रंगकर्मींना मार्गदर्शक तत्त्वे म्हणून वापरले जाईल. हा ग्रंथ आजही समकालीन आहेत.
प्रवीण काळोखे, नाट्यदिग्दर्शक, नाशिक