

नाशिक : वृत्तपत्र विक्रेता हा असंघटित घटक आहे. अनेक दिवस ते कल्याणकारी मंडळाची मागणी करत आहेत. त्याचीही घोषणा लवकरच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी याबाबतची मागणी केली होती. अशी माहिती राज्य संघटनेचे संघटन सचिव महेश कुलथे, उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, स्वावलंबी समितीचे सदस्य भारत माळवे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, नाशिक शहर संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, नवीन नाशिक सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोल त्याचबरोबर चारही संघटनेचे सर्व पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी दिली.
लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र विक्रेता हा महत्वाचा घटक आहे. कामाची पद्धत, कामाची वेळ, अल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी, अशी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने गेली पंधरा वर्षे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रिफ, संभाजी पाटील निलंगेकर, दिलीप वळसे-पाटील व विद्यमान कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. संभाजीराव पाटील निलंगेकर कामगार मंत्री असताना त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाबाबत अभ्यास समिती नेमली. या समितीने आपला अहवालही सादर केला. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे अशी शिफारस केली आहे. मात्र त्यानंतर चार वर्षे झाली तरी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागणीचा आ. संजय केळकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. आमदार केळकर यांनी सध्या सुरू असणार्या अधिवेशनातही स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी केली.
आम्ही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे पाठपुरावा करत आहोत. आ. केळकर यांनी यावेळीही मागणी मांडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच घोषणा करण्याचे आश्वासन दिले. ही आनंदाची व सकारात्मक बाब आहे. आ. केळकर यांच्या माध्यमातून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. लवकरात लवकर मंडळाची घोषणा व्हावी व अंमलबजावणी सुरू व्हावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार आदींनी दिली.