

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
येथील ढग्या डोंगर परिसरात सध्या विविध सर्पप्रजातींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, विषारी नाग व घोणस यांचेही दर्शन वारंवार होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पांचा वावर वाढण्याची शक्यता लक्षात घेता ढग्या डोंगरावर येणाऱ्या पर्यटक, भाविक तसेच स्वयंसेवकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन सिन्नर ढग्या डोंगर संवर्धन समितीतर्फे करण्यात आले आहे.
ढग्या डोंगर परिसरातील सर्पोद्यानात विविध प्रजातींचे सर्प आढळून येत आहेत. या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यात आले आहेत. 'सर्प उद्यान' असा फलक असलेल्या ठिकाणी पर्यटक व भाविकांनी प्रवेश करू नये. तसेच निश्चित केलेली पायवाट सोडून झाडी, दगडांच्या कपारी किंवा इतर ठिकाणी जाणे टाळावे, असे समितीने स्पष्ट केले आहे.
ढग्या डोंगराची जैवविविधता जपण्यासाठी संवर्धन समितीचे स्वयंसेवक नियमितपणे श्रमदान व विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहेत. या कामादरम्यान स्वयंसेवकांनीही सुरक्षेची आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ढग्या डोंगर संवर्धन समितीचे सेवक सुरेंद्र क्षत्रिय, संतोष शिंदे, विशाल खालकर, दत्ता जोशी, जुगल लोया, तुषार रायजादे, सागर देशमुख, सुधाकर गडाख, कपिल कोठुरकर, नितीन वराडे, नंदकुमार निकम, संजय पाटील, नितीन कटारे, अमोल चव्हाण आदींनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
नुकतेच ढग्या डोंगरावरील वृक्षांना पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या तळ्यामध्ये घोणस साप आढळून आला. याबाबत माहिती मिळताच संवर्धन समितीच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी पोहोचून सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य धोका टळण्यास मदत झाली.