

नाशिक : एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर या वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक)कडून 'अ' दर्जा मानांकन प्राप्त झाले. नॅकने नुकतेच मूल्यांकन करून हे मानांकन बहाल केले. पहिल्याच फेरीत अशा प्रकारचे मानांकन मिळविणाऱ्या देशातील मोजक्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाची गणना होत आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्रातील मूल्याधिष्ठित वैद्यकीय शिक्षण तसेच सर्वसामान्यांना परवडणारी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणारी अग्रगण्य व विश्वसनीय संस्था म्हणून एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय अधोरेखित झाले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने दि. ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सेवा-सुविधांसह वैद्यकीय शिक्षण व विविध उपचार पद्धती यांसाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता, वैद्यकीय शिक्षण शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी केलेले कार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन व नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला.
त्याचबरोबर मध्यवर्ती सुसज्ज ग्रंथालय, स्वतंत्र डिजिटल लायब्ररी, पाच सॅटेलाइट सेंटर, जैविक कचरा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह व कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, क्रीडांगण, पर्यावरणपूरक परिसरासाठी सौर ऊर्जानिर्मिती, जल पुनर्भरण प्रकल्प आणि महाविद्यालय स्तरावरील विविध समित्या, गुणवत्ता मापक समिती यांसह इतर बाबींची सखोल गुणवत्ता तपासणी या समितीकडून करण्यात आली होती.
या मानांकनामुळे शैक्षणिक व आरोग्यसेवा देण्याचे सातत्य टिकवून ठेवण्याची तसेच त्या अधिक उत्तम करण्याची जबाबदारी संस्थेला प्राप्त झाली आहे. हे यश व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे, नियोजनपूर्वक शैक्षणिक सुधारणा, एनएबीएच मानकांशी सुसंगत रुग्णालय सेवा आणि प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी आयएमएसआरसी
नॅक मानांकन हे पाच वर्षांसाठी वैध असते. या कालावधीत महाविद्यालयाने विद्यार्थिकेंद्रित व तंत्रज्ञानाधारित अध्यापन अधिक बळकट करणे, संशोधन प्रकाशनांची संख्या वाढवणे तसेच ग्रामीण व वंचित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कॅम्पस हॉस्पिटल मॉडेलला अधिक परिणामकारक करणे, अशी पुढील दिशा महाविद्यालयाने जाहीर केली आहे.
डॉ. संदीप लांबे, आयक्यूएसी समन्वयक, एसएमबीटी आयएमएसआरसी