नाशिक : शहर काँग्रेस सेवा दलाने गुरुवारी प्रतीकात्मक दुर्बिणीने स्मार्ट नाशिकचा शोध घेत उपहासात्मक पद्धतीने महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या कारभाराचा निषेध नोंदवला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जात असल्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र त्यामुळे नाशिककरांना जीव गमवावा लागत असून, त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेस सेवा दलामार्फत दुर्बिणीतून चला शोधूया स्मार्ट नाशिक असे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात निमाणी बसस्थानक येथे आंदोलन झाले. या ठिकाणी चार फूट लांबीची दुर्बीण ठेवून त्यातून स्मार्ट नाशिक दिसते का असा सवाल नाशिककरांना विचारला. महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे सामान्य नागरिक हैराण झालेला असून, नाशिककरांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सेवा दलाने केला. तसेच प्रशासन हे प्रश्न कधी सोडवणार, करोडो रुपये खर्चूनही शहर खड्ड्यातच आहे. शहरात स्वच्छता नाही, करोडो रुपयांचा यांत्रिक झाडू धूळ खात पडून आहे, विकासकामांच्या नावाखाली नाशिक शहर वेठीस धरण्याचे काम सुरू आहे, प्रदूषणमुक्त गोदावरी नदी अद्याप दिसत नाही, असे आरोप यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, ज्येष्ठ नेते शाहू खैरे, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे, वत्सला खैरे, पदाधिकारी हनीफ बशीर, संतोष जाधव, उद्धव पवार, स्वाती जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.