

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामपंचायतींनी दिलेल्या जुन्या हस्तलिखित जन्म आणि मृत्यू दाखल्यांचे डिजिटायझेशन करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्य संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन होत असल्याने दाखले वितरणास मोठा विलंब होत असून, यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
शासनाने १ जानेवारी २०१८ नंतर डिजिटल दाखले देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीचे दाखले हस्तलिखित स्वरूपात असल्याने आणि सध्या सर्वत्र ऑनलाइन डिजिटल दाखल्यांचीच मागणी होत असल्याने नागरिकांची धावपळ सुरू आहे.
'आपले सरकार' केंद्रांमार्फत हे अर्ज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पाठवले जात आहेत. आतापर्यंत २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाले असून, मार्चपर्यंतचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. परंतु, दररोज ५०० हून अधिक नवीन अर्जांची भर पडत असल्याने सध्या ६ हजारांपेक्षा जास्त दाखले प्रलंबित राहिले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रांपंच्या हस्तलिखित दाखल्यांवरून परदेशी नागरिकांना रहिवासी ठरविल्याचा आरोप केल्यानंतर प्रशासनाने १ जानेवारी २०१८ पूर्वीचे दाखले डिजिटल करण्याची मोहीम तीव्र केली. शासनाने वर्षभरापूर्वीच याबाबत निर्देश दिले होते, मात्र ऐनवेळी नागरिकांची एकाच वेळी गर्दी झाली.