Spandan Sonar Inspiring Story | खेळण्या-खाऊची स्वप्ने बाजूला ठेवून दुष्काळग्रस्तांसाठी पिगी बँक फोडली; स्पंदनच्या कृतीचे कौतुक

Spandan Sonar Inspiring Story | पिगी बँक फोडून सहा वर्षांच्या स्पंदनचे मुख्यमंत्री सहायता निधीला १,६०० रुपये
Spandan Sonar Inspiring Story
Spandan Sonar Inspiring Story
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लहान मुलांचे विश्व म्हणजे खेळणी, चॉकलेट, खाऊ आणि आपल्या छोट्या छोट्या इच्छा. या इच्छा पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या पैशांतून काही रक्कम मुले आवडीने पिगी बँकेत साठवतात. कधीतरी ती पिगी बँक फोडून आपल्या आवडीचे खेळणे घ्यायचे, चॉकलेट खायचे, अशी त्यांची स्वप्ने असतात. मात्र अमृतधाम परिसरातील अवघ्या सहा वर्षांच्या स्पंदन सोनार याने आपल्या पिगी बँकेतील पैशांतून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याऐवजी गरजूंच्या मदतीचे स्वप्न साकार केले आहे.

Spandan Sonar Inspiring Story
Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थाच्या रस्ते कामांमध्ये वीजवाहिन्यांचा धोका; महापारेषणचा नाशिक महापालिकेला गंभीर इशारा!

राज्यातील दुष्काळग्रस्त आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी त्याने आपली पिगी बँक फोडून त्यातील तब्बल १ हजार ६०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देत माणुसकीचा अनोखा आदर्श घालून दिला. स्पंदन हा एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असून, त्याचे आई व वडील ग्रामविकास विभागाशी संबंधित नोकरीत आहेत.

त्यामुळे घरात ग्रामीण भागातील दुष्काळाच्या चर्चा कानावर पडत असताना अवघे ६ वर्षे वय असलेल्या स्पंदनला इतरांच्या दुःखाची जाणीव करून घेण्याची निर्माण झालेली संवेदनशीलता मोठ्यांनाही अंतर्मुख करणारी ठरली आहे. दूरचित्रवाणीवरील बातम्या आणि घरातील चर्चांमधून राज्यातील दुष्काळग्रस्त, संकटात सापडलेले आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक यांच्याविषयी त्याला माहिती मिळाली. त्यांच्या अडचणी ऐकून त्याचे बालमन अस्वस्थ झाले.

आपणही अशा लोकांसाठी काहीतरी मदत करू शकतो का, असा निरागस प्रश्न त्याने आई-वडिलांना विचारला. मुलाच्या मनात निर्माण झालेल्या या मदतीच्या भावनेला पालकांनीही प्रोत्साहन दिले.
त्यानंतर स्पंदनने महिनोमहिने जपून ठेवलेली पिवळ्या रंगाची पिगी बँक उघडण्याचा निर्णय घेतला. त्यात जमा झालेली प्रत्येक नोट आणि नाणे त्याच्यासाठी मौल्यवान होते. मात्र स्वतःच्या आनंदापेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान पाहण्याची भावना त्याच्यासाठी मोठी ठरली. पिगी बँकेतून बाहेर आलेल्या नोटा आणि नाणी त्याने एका कागदावर हिशेब लिहून मोजली.

Spandan Sonar Inspiring Story
Nashik Accident | कसबे वणी–नाशिक रस्त्यावर कारचा भीषण अपघात; १ ठार, ६ जखमी

पाचशे रुपयांची एक नोट, दोनशे रुपयांची एक नोट, शंभर रुपयांच्या पाच नोटांसह पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या नोटाही त्यात होत्या. याशिवाय दहा, वीस, पाच, दोन आणि एक रुपयांची नाणीही त्याने जपून ठेवली होती. अशा प्रकारे त्याच्या बचतीतून १ हजार ६०० रुपये जमा झाले.

ही रक्कम घेऊन स्पंदन पालकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्याने ही रक्कम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सुपूर्द केली. लहानग्या स्पंदनच्या या संवेदनशीलतेचे परिसरात कौतुक होत असून, छोट्या हातांनी केलेली ही मोठी मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

"स्पंदनने स्वतःच्या खाऊसाठी, खेळण्यासाठी किंवा आवडीच्या वस्तू घेण्यासाठी साठवलेली संपूर्ण रक्कम दुसऱ्यांच्या मदतीसाठी दिली. या सहा वर्षांच्या मुलाने घेतलेला निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर त्यातून त्याच्यावर झालेल्या संस्कारांचे आणि सामाजिक जाणिवेचेही दर्शन घडते."

— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.