

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
येथील पोलिसांच्या ट्रॅफिक शाखेने करणाऱ्या विशेष नाकाबंदी व वाहतूक तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन वाहनचालकांविरोधात धडक कारवाई केली. दोन दिवसांत एकूण ६० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, १ लाख १ हजार ५०० रुपयांचा ऑनलाइन दंड आकारण्यात आला.
तसेच नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी ११ वाहने जप्त करून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. गुरुवारी (दि. २५) ट्रॅफिक शाखेने ३९ वाहनांवर कारवाई करून ७६ हजार ५०० रुपयांचा ऑनलाइन दंड आकारला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २६) करण्यात आलेल्या विशेष नाकाबंदीदरम्यान आणखी २१ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत २५ हजार रुपयांचा ऑनलाइन दंड आकारण्यात आला. याशिवाय ११ वाहने जप्त करून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधातील मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फॅन्सी, विना नंबर प्लेट वाहने रडारवर
मोहर्रम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सिन्नर पोलिसांनी आरसीपी प्लटूनच्या सहकार्याने शहरातील मोहर्रम सवारी मार्गावर रूट मार्च काढला. विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट प्रवास आदी प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांनी एकूण ३८ वाहतूक नियमभंगाच्या केसेस दाखल केल्या
सात संशयित वाहने ताब्यात
विना नंबरप्लेट असलेली सात संशयित वाहने ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी सुरू केली आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, वाहनांवर अधिकृत नंबर प्लेट लावण्याचे आवाहन केले आहे.