Sinnar Nagar Parishad | अग्निशमन बंब यंत्रणा ठप्प; एक कालबाह्य, दुसरा गळका

Nashik Sinnar : सिन्नरकरांची अग्निसुरक्षा वार्‍यावर; नगर परिषदेचा हलगर्जीपणा
सिन्नर नगरपरिषद, नाशिक
सिन्नर नगरपरिषदPudhari News Network
Published on
Updated on

सिन्नर : संदीप भोर

सिन्नर नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा सद्यस्थितीत ठप्प आहे. दोन पैकी एक अग्निशमन बंब कालबाह्य झाला असून, दुसरा गळका असल्याने तोही वापरबाह्य आहे. त्यामुळे सिन्नरकरांची अग्निसुरक्षा वार्‍यावर असल्याचे दिसून येते. असे असतानाही नगर परिषद प्रशासन या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसत आहे.

Summary

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन उद्योग वसाहती, शहरातून जाणारे विविध महामार्ग यामुळे कारखाने, घरे, महामार्गांवरून मार्गक्रमण करणार्‍या वाहनांना आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत असतात. पण, आता अशी घटना शहरात अथवा परिसरात घडल्यास सिन्नरकरांना नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेची मदत होणार नाही, हे नक्की. कारण नगर परिषदेकडे असलेले दोन्ही बंब आजमितीला बंद आहेत.

माळेगाव औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र आगीची घटना घडल्यास तिच्यावर मदतकार्यासाठी अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. सध्या उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत असून जंगलांना वणवा, वाहनांना आगीच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीतही नगर परिषद प्रशासन ढिम्म आहे. त्यावर कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही. बंबच बंद असल्याने अग्निशम यंत्रणेचे कर्मचारीदेखील हातावर हात बांधून आहेत. नगर परिषद प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा करीत आहे काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.

सिन्नर, नाशिक
सिन्नर नगरपरिषदेचा खराब झालेला अग्निशमन बंबPudhari News Network

दरम्यान, गंभीर प्रश्नाबाबत मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना विचारणा केली असता, त्यांनी सोयीस्कर सारवासरव केली. बंब बंद नसून, तो दुरुस्त करून वापरला जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तथापि, प्रस्तुत प्रतिनिधीने सोमवारी (दि. 17) सायंकाळी याप्रश्नी थेट नगर परिषद कार्यालयात यंत्रणेला भेट दिली असता, कर्मचार्‍यांनी केवळ 15 मिनिटांतच बंबातील पाणी गळून जात असल्याची माहिती दिली.

सिन्नर, नाशिक
सिन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन बंबPudhari News Network

एखादी मोठी दुर्घटना घडून हा प्रश्न उद्या आपल्यावर शेकायला नको म्हणून त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्याधिकार्‍यांना लेखी पत्राद्वारे बंब दुरुस्तीची मागणी केल्याचे सांगितले. त्याची प्रत आणि पोहोच घेतल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावरून कर्मचारी याप्रश्नी गंभीर असल्याचे दिसतात. तथापि, जबाबदार अधिकारी मुख्याधिकारी मात्र सारवासारव करण्यात धन्यता मानत असल्याचे जाणवले. राज्याचे मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे खासदार सिन्नरचे असताना ही एवढी ढिलाई कशी म्हणून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे यांनी याप्रश्नी लक्ष घालून नगर परिषद प्रशासनाला जागे करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

गळती लागलेला अग्निशमन बंब दुरुस्तीसाठी निविदाप्रक्रिया राबवली असून पुणे येथील ठेकेदाराला दुरुस्तीचे काम दिलेले आहे. बंब दुरुस्तीसाठी पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. लवकरात लवकर बंब दुरुस्त करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र अग्निशमन संचालनालय व जिल्हाधिकार्‍यांकडे नवीन अग्निशमन बंबासाठी प्रस्ताव पाठवलेले आहेत.

रितेश बैरागी, मुख्याधिकारी, सिन्नर नगरपारिषद, नाशिक.

दोन महिन्यांपासून नाचवले जाताहेत कागदी घोडे!

नगर परिषदेचा बंब 20 ते 22 वर्षांपूर्वीचा असून तो कालबाह्य झाल्याने बंद अवस्थेत आहे. दुसरा बंब 10 ते 12 वर्षांपूर्वीचा असून त्याची टाकी गळकी आहे. त्यात पाणीच थांबत नसल्याने तोही वापरबाह्य झाला आहे. दोन महिन्यांपासून नगर परिषदेकडून कागदी घोडे नाचवले जात आहेत. तत्काळ प्रक्रिया राबवून नवा अग्निशमन बंब उपलब्ध करण्याची गरज आहे

‘स्टाइस’मधील कारखान्यांच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी माळरानावरील गवताला आग लागली होती. त्यावेळी तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला मदतीसाठी पाचारण केले होते. त्यांनी असमर्थता दर्शवली होती. उद्योग नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या सिन्नरमध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असणे म्हणजे एखाद्या मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण म्हणावे लागेल.

अतुल अग्रवाल, व्हा. चेअरमन, स्टाइस, सिन्नर, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news