

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थाच्या कामांनी गती घेतलेली असताना जिल्हयाच्या ग्रामीण भागातील सर्वतीर्थ टाकेद, कावनई व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चक्रतीर्थ या ठिकाणांचाही विकास होणार आहे. त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आली आहे. यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना सिंहस्थात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
तीर्थक्षेत्र विकास निधीतून अनेक कामे होत असतात. त्या तुलनेत इतर ठिकाणांचा विकास झालेला नाही. यामुळे कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांनी या तीन ठिकाणांचे मंदिर, कुंड यांचे पुरातत्व विभागाप्रमाणे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असून ती जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे.
या तीन ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढेल व पर्यटनाला चालना मिळेल यासाठी काय करता येईल,याचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर त्या कामांसाठी कुंभमेळा प्राधिकरणकडून निधी मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
...या तिर्थक्षेत्राचा होणार कायापालट
सर्वतीर्थ टाकेद : येथे रामायणकाळात रावण व जटायू यांचे युध्द झाले असून त्या युद्धात जखमी जटायू याला श्रीराम व लक्ष्मण यांनी तीर्थ देऊन अखेरचा निरोप दिला, असा रामायणात उल्लेख आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. येथील कुंडात स्नानासाठी भाविक येत असतात. हे ठिकाण पट्टा किल्ल्यापासून जवळ असून येथे सिंहस्थानिमित्त सुधारणा केल्यास तेथील पर्यटनास चालना मिळू शकते. केंद्र सरकारच्या रामायण सर्किटमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे.
कावनई : इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी कावनई हे तीर्थ आहे. या ठिकाणी कपील मुनी यांनी आईच्या मुक्तीसाठी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. यामुळे याला मातृतीर्थ असेही म्हटले जाते. येथील तिर्थस्थळाचे पुनरुज्जीवन झाल्यास या भागातील पर्यटनात वाढ होऊ शकते.
बेझे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे या गावात गोदावरीच्या पात्रात हे कुंड आहे. भगवान विष्णूने सुदर्शन चक्र मारून या कुंडाची निर्मिती केल्याचे पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत. गोदावरी ही ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावत असली तरी ती वाहत्या स्वरुपात याच चक्रतीर्थावर दिसते. तेथे या कुंडातून बाराही महिने गोदावरीचा प्रवाह वाहत असतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थात गोसावी व बैरागी या आखाड्यांच्या साधुंमध्ये शाहीस्नानाच्या क्रमावरून अठराव्या शतकात मोठी लढाई झाली होती. त्यावेळी बैरागी आखाड्यांच्या साधुंनी त्र्यंबकेश्वर सोडले व पुढच्या पर्वणीत त्यांनी या चक्रतीर्थ येथे शाहीस्नान केल्याच्या ऐतिहासिक नोंदी असल्याचे सांगितले जाते.