

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटीतील तपोवन आणि इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरणास तत्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे.
सिंहस्थकाळात पंचवटीमधील तपोवन, रामकुंड परिसरासह दसक पंचक आणि इतरही भागांत सिंहस्थ कालावधीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर आवशयक आरोग्यसेवेची सज्जता गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने विविध रुग्णालयांचे विस्तारीकरण व नूतनीकरण करण्यासह शस्त्रक्रिया गृह अद्ययावत करणे, रुग्णवाहिका खरेदी असे नियोजन केले आहे. गत सिंहस्थ काळात तपोवन येथे उभारण्यात आलेल्या दवाखान्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण केले जाणार आहे. या रुग्णालयाला आणखी मजला बांधकाम करून त्याठिकाणी १०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच इंदिरा गांधी रुग्णालयात ५० खाटा असून, त्याठिकाणी देखील आणखी ५० खाटांची व्यवस्था करून रुग्णालयाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. याशिवाय याठिकाणी अद्ययावत असे शस्त्रक्रियागृह उभारले जाणार आहे.
वैद्यकीय विभागाचा 84 कोटींचा आराखडा
सिंहस्थातील आरोग्य सेवेसाठी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने ८४ कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यात तपोवन, इंदिरा गांधी रुग्णालयासह झाकिर हुसेन रुग्णालयाचे नूतनीकरण तसेच शहरात विविध ठिकाणी छोटे दवाखाने उभारले जाणार आहेत. यातील तपोवन व इंदिरा गांधी रुग्णालयास प्राधान्य देण्यात आले असून, काम करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळावी, अशी मागणी सिंहस्थ प्राधिकरणाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.