

नाशिक : सिंहस्थाच्यादृष्टीने पर्वणीला येणार्या कोट्यवधी भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक रोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्याची तयारी करावी, प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजुंनी भाविकांना उतरला येईल, अशी व्यवस्था असावी, असे निर्देश विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी दिले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या २२ महिन्यांवर येऊन ठेपल्याने नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाकडून सिंहस्थाच्या तयारीचे नियोजन सुरू आहे. मंगळवारी (दि. ४) यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी नाशिक रोड रेल्वेस्थानकामागे ११ एकर जागेत नवीन प्लॅटफॉर्म, तसेच ओढा व देवळाली कॅम्प येथे प्लॅटफॉर्म उभारण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले. वुडशेड आणि मालधक्का शिफ्ट करण्याबाबतही मंथन करावे. गर्दी नियंत्रणासाठी पायर्यांऐवजी स्लॅब तयार करावा आणि नाशिक रोडऐवजी ओढा व देवळाली कॅम्प येथेच रेल्वे थांबवावी. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मची रुंदी ४० मीटरपेक्षा अधिक असावी. पोलिसांनी घाट, रस्ते आणि पुलांचे नियोजन करावे. रेल्वेस्थानक ते गोदाघाट दरम्यान एकेरी मार्गांचा विचार करावा. ट्राफिक विभागाने प्रथम रस्त्यांची कामे पूर्ण करून नंतर सीसीटीव्ही बसवावेत. तसेच, तपोवन, लक्ष्मी नारायण मंदिरासमोर आणि दसक पंचकजवळ घाट उभारण्याचा विचार करावा, असे सांगितले.
किमान 20 किमीचा घाट हवा
प्रयागराजच्या दौऱ्यानंतर विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी गोदावरी काठावर गर्दी नियंत्रणासाठी सध्याच्या 5 किलोमीटर घाटाऐवजी पाचपट अधिक घाट आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, एसटीपीचे टेंडर झाल्यानंतर तातडीने रस्त्याच्या कामांसाठी टेंडर तयार करून कामे सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या.
साधुग्रामसाठी 800 एकर जागा आवश्यक असून, ती भाडेतत्वावर घ्यावी असा पर्याय आहे. नांदुर-मानुर शिवारात जमीन भाड्याने घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून, त्यानुसार काम सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
नाशिक-त्र्यंबक रस्ता २४ मीटरपर्यंत रुंद करण्यासह विविध मार्गांची देखभाल, दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यात घोटी-त्र्यंबक, द्वारका-सिन्नर, नाशिक-धुळे, तसेच तीर्थस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे.
शहराभोवती छोट्या-छोट्या रस्त्यांचे जाळे आहे. या रस्त्यांचा ९१ किलोमीटरचा रिंगरोड तयार करुन तो शहराच्या बाजुने फिरवावा. या रिंगरोडला एसएच-37 अर्थात स्टेट हायवे 37 जोडण्यात यावा. सर्व रस्ते रेल्वेस्टेशन, विमानतळ तसेच समृध्दी महामार्गाला जोडण्यात यावे, अशा सूचना आहेत.