

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला असताना केंद्र व राज्य शासनाकडून मात्र अद्याप कुठलाही निधी मिळाला नसल्याने सिंहस्थ कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी तब्बल ५७६ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. यापैकी ३०० कोटी थेट कर्जाद्वारे, तर २७६ कोटी रुपये कर्जरोख्यांद्वारे उभारले जाणार आहेत.
येत्या २०२७ मध्ये नाशिकनगरीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे ५ लाख साधू-महंत आणि १० कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेने सेवा-सुविधांसाठी १५ हजार कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र, आता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला असतानाही केंद्र व राज्य शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.
सिंहस्थासाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र हा निधी महापालिकेला, सिंहस्थ प्राधिकरणाला की अन्य शासकीय यंत्रणांना याविषयी शासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दुसरीकडे सिंहस्थ कामांतील विलंबामुळे साधू-महंतांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने कामांसाठी कर्ज घेऊन निधी उभारण्याची तयारी सुरू आहे.
सिंहस्थ कामांसाठी ३०० कोटींचे थेट कर्ज काढले जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून स्वारस्य देकार मागविले जाणार असून कमी व्याजावर, आठ ते दहा वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीवर निधी उपलब्ध करून देणाऱ्या बँकेकडून कर्ज उचलले जाणार आहे.
सिंहस्थ कामांसाठी ३०० कोटी थेट कर्ज व २७६ कोटी कर्जरोख्यांद्वारे उभारले जाणार असून, यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू होणार आहे. कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून देकार मागवले जातील.
दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, नाशिक महापालिका.
तीनशे कोटींची रक्कम थेट कर्जाद्वारे उभारताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर आणखी २७६ कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. यात २०० कोटी कर्जरोखे, केंद्राकडून १३ टक्के प्रोत्साहन निधीद्वारे २६ कोटी आणि महापालिकेच्या हिश्यापोटी ५० कोटी अशाप्रकारे २७६ कोटींचे कर्जरोखे काढले जाणार आहे.