

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ४३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थ कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार असल्याने शासनाकडून भरीव सिंहस्थ निधीची महापालिकेला अपेक्षा आहे. शासनाकडून मिळणारा निधी आणि महापालिकेचा हिस्सा एकत्रित केल्यानंतरही निधीची अपुर्तता निर्माण झाल्यास कर्ज उभारण्याची तयारी देखील महापालिकेकडून केली जात असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे ३०५४.७० कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गेल्या आठवड्यात स्थायी समितीला सादर करण्यात आले. या अंदाजपत्रखात सिंहस्थ कामांसाठी महापालिका हिश्यापोटी ४२५ कोटींची थेट तरतूद करण्यात आली आहे. सिंहस्थ आराखडा वगळता ११५ कोटींची अतिरीक्त सिंहस्थ कामेही हाती घेतली जाणार आहेत. यासाठी या अंदाजपत्रकात ५ कोटींची टोकन तरतूद धरण्यात आली आहे. तसेच वृक्ष निधीच्या स्वतंत्र अंदाजपत्रकातही सिंहस्थासंदर्भातील कामांसाठी ४.७५ कोटींची तरतूद आहे. या निधीच्या उपलब्धतेसाठी महापालिकेकडून सुमारे २०० कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत महापालिकेने तसेच अन्य विभागांनी तयार केलेले एकत्रित सिंहस्थ आराखडा पंधरा हजार कोटींवर पोहोचला आहे. अद्याप या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थाची उच्चस्तरीय समितीची बैठक होत आहे. या बैठकीत सिंहस्थ आराखड्याला तत्वत: मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ आराखड्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून किती निधी मिळेल, हे स्पष्ट होऊ शकणार आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने सात हजार ७६७ कोटींचा आराखडा तयार केला असला तरी या सर्वच निधीला शासनाकडून मंजुरी मिळेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे सिंहस्थ आराखडा व्यतिरीक्त सिंहस्थासाठी आवश्यक असलेली अनेक कामे महापालिकेला स्वनिधीतून करावी लागणार आहे. यासाठी निधीच्या उपलब्धतेसाठी प्रसंगी कर्ज उभारण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात असल्याचे वृत्त आहे.
अंदाजपत्रकीय तरतूदीतून महापालिका सिंहस्थ कामांचा खर्च भागवेल. त्याव्यतिरिक्त निधीची आवशक्यता भासल्यास कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल.
दत्तात्रय पाथरुट, मुख्यलेखाधिकारी, नाशिक महापालिका.