

नाशिक : सिंहस्थ कामांना विलंब होत असल्याने, नाशिकमधील सुमारे 10 आखाड्यांच्या महंतांची बैठक मंगळवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता जुना आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरात वैष्णव आखाड्याचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
बैठकीत साधुग्रामसाठी संपादित करण्यात येणारी जमीन, त्यासाठी करावे लागणारे भूसंपादन, तपोवनातील अतिक्रमण हटविणे, सिटीलिंक बसस्टॅण्ड हटविणे, साधू- महंतांच्या पंडालसाठी जागा आरक्षित करणे, मठ- मंदिरांचे मजले वाढविणे, वीजबिलात सवलत मिळणे, गंगाघाटांची संख्या वाढविणे, वाहनतळांची निर्मिती आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
मागील कुंभमेळ्यात खालसा परंपरेच्या सुमारे 1 हजार साधूंना पंडालसाठी जागा मिळाली नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. त्यामुळे साधू- महंतांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण तयार झाले होते. यंदाच्या कुंभमेळ्यात अशा प्रकारचे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिकमधील साधू- महंतांनी प्रशासनाच्या सहकार्याने सिंहस्थाच्या कामांना सुरुवात केली आहे. सिंहस्थ जवळ आल्याने कामे रेंगाळू नये, अशी भूमिका साधू- महंतांची असून, ही भूमिका प्रशासनासमोर मांडण्याअगोदर साधू- महंतांची बैठक होत असल्याची माहिती महंत भक्तिचरणदास महाराज यांनी दिली.